|| महेश बोकडे

वैद्यकीय शिक्षण खात्याकडून शासकीय दंत महाविद्यालयातील ज्येष्ठता सूचीला हरताळ :- शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय येथे प्रभारी अधिष्ठातापदाचा वाद पेटला आहे. वैद्यकीय शिक्षण खात्याने येथे ज्येष्ठता सूचीला हरताळ फासत खालच्या क्रमांकावरील व्यक्तीला अधिष्ठातापदाची अतिरिक्त जबाबदारी दिली आहे. जानेवारी- २०१८ ला डॉ. विनय हजारे निवृत्त झाल्यापासून शासनाने येथे कायम अधिष्ठाता दिला नाही. त्यामुळे येथील प्रशासकीय कामातही अडचणी येत आहेत.

राज्यात नागपूर, मुंबई, औरंगाबाद येथे तीन शासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये आहेत. पैकी औरंगाबादच्या महाविद्यालयात डॉ. डांगे हे कायम अधिष्ठाता आहेत. मुंबई आणि नागपूरच्या अधिष्ठाताचे पद हे रिक्त आहे. नागपूरच्या महाविद्यालयातून जानेवारी- २०१८ मध्ये डॉ. विनय हजारे निवृत्त झाल्यावर डॉ. सिंधू गणवीर यांना अधिष्ठातापदाची अतिरिक्त जबाबदारी दिली गेली. परंतु त्या ऑक्टोबर- २०१९ मध्ये निवृत्त झाल्या. नंतर अधिष्ठातापदाची अतिरिक्त जबाबदारी वैद्यकीय शिक्षण खात्याने डॉ. मंगेश फडणाईक यांना सोपवली. तीन वर्षांपासून दंत महाविद्यालयांतील अधिकाऱ्यांच्या ज्येष्ठता सूचीचा वाद सुरू आहे.

डॉ. वसुंधरा भड यांनी या यादीला तीन वर्षांपूर्वी आव्हान दिले होते. त्यानुसार डॉ. भड आणि डॉ. मंगेश फडणाईक यांची वैद्यकीय शिक्षण खात्यातील ज्येष्ठता सारखीच आहे. दोघांना सारख्याच पदोन्नतीही मिळाल्या आहेत. शासनाच्या नियमानुसार सेवा कालावधीसह वयाने ज्येष्ठ असलेल्याचा  क्रमांक सूचीत वरचा असतो. परंतु वैद्यकीय शिक्षण खात्याने जुन्या यादीनुसार डॉ. फडणाईक यांचा क्रमांक वर ठेवला होता. डॉ. भड यांचे आव्हान मान्य करून शासनाने ११ डिसेंबर २०१९ मध्ये ज्येष्ठता सूचीत सुधारणा करत डॉ. भड यांचा क्रमांक वर केला. त्यानंतर डॉ. भड यांनी २१ डिसेंबरला अधिष्ठातापदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्याची मागणी वैद्यकीय शिक्षण खात्याला केली. परंतु तेथून काहीही कारवाई झाली नाही.

शासनाने ज्येष्ठता यादीत सुधारणा केल्यावर माझे नाव वरच्या क्रमांकावर आले आहे. त्यामुळे मी वैद्यकीय शिक्षण खात्याला एक पत्र दिले आहे. ही आमच्या वैद्यकीय शिक्षण खात्याची अंतर्गत बाब असल्यामुळे त्यावर बोलणे योग्य ठरणार नाही. – प्रा. डॉ. वसुंधरा भड, शासकीय दंत महाविद्यालय

शासकीय दंत महाविद्यालयातील  अधिष्ठाता निवृत्त झाल्यास वैद्यकीय शिक्षण खात्याला ज्येष्ठता यादीतील कोणत्याही क्रमांकावरील व्यक्तीला ही जबाबदारी देता येते. नियमानुसार ही  प्रक्रिया करून डॉ. फडणाईक यांना ती सोपवली आहे. या पद्धतीची माहिती कुणी अधिकारी प्रसारित करत असल्यास त्यावर कारवाई केली जाईल. – डॉ. तात्याराव लहाने, वैद्यकीय संचालक, मुंबई.