वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची माहिती

सिकलसेल संदर्भातील उपचारासंदर्भात सर्व चाचण्या करण्याची सुविधा इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेयो) आहेत. मात्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) गर्भजल चाचणी केंद्र हा संशोधनात्मक उपक्रम होता व तो अनुदानाअभावी बंद पडला असून महिनाभरात सुरू करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत सांगितले.

विदर्भात मोठय़ा प्रमाणात सिकलसेलचे रुग्ण असून त्यांच्यावर उपचाराकरिता नागपुरातील मेडिकल रुग्णालयात २००७ मध्ये गर्भजल परीक्षण केंद्र सुरू करण्यात आले. मात्र, २०१२ मध्ये गर्भजल परीक्षण केंद्र बंद पडले आहे. त्यामुळे महिलेच्या पोटातील बाळाला सिकलसेल आहे किंवा नाही, याचे परीक्षण करण्यासाठी नागपुरात सुविधा नाही.

त्यामुळे येथील रुग्णालयात अशी सुविधा निर्माण करणे, त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान व तंत्रज्ञ उपलब्ध करून देण्याच्या मागणीचा मुद्दा आमदार अनिल सोले, नागो गाणार, गिरीश व्यास यांनी लक्षवेधीद्वारे  विधान परिषदेत उपस्थित केला. त्यावर निवेदन करताना महाजन यांनी सांगितले की, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) मार्फत सिकलसेल केंद्र सुरू करण्यासाठी अनुदान मिळाले होते. त्यातून २००७ मध्ये मेडिकलमध्ये गर्भजल परीक्षण केंद्र सुरू करण्यात आले.

त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान, मनुष्यबळ आणि इतर बाबींचा पुरवठा आयसीएमआरद्वारे करण्यात येत होता. हा उपक्रम संशोधात्मक होता व त्याचा कालावधी पाच वर्षांचा होता. कालावधी संपुष्टात आल्यानंतर केंद्र २०१२ मध्ये बंद झाले.  केंद्रासाठी करण्यात आलेल्या नियुक्त्याही कंत्राटी तत्त्वावर होत्या. त्यानंतर आयसीएमआरने मेयोमध्ये सिकलसेल केंद्र सुरू केले. त्याठिकाणी गर्भजल परीक्षण वगळता सिकलसेलच्या सर्व चाचण्या करण्यात येतात. गर्भजल परीक्षणासाठी नमुने मुंबईतील केईएम रुग्णलयात पाठवण्यात येतात. मात्र, नागपुरात गर्भजल परीक्षण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. येत्या महिनाभरात आयसीएमआर आणि सीएसआयआरच्या मदतीने तीन एकर जागेत गर्भजल परीक्षण केंद्र सुरू करण्यात येईल, असे महाजन यांनी सांगितले.