संपर्कात आलेल्यांसाठी शोधमोहीम

मालेगाव : मंगळवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार मालेगावात आढळून आलेल्या पाच करोनाबाधित रुग्णांमध्ये शेजारच्या बागलाण तालुक्यातील नामपूरच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याचा डॉक्टर पत्नीसह समावेश आहे. यामुळे प्रशासकीय पातळीवर एकच धावाधाव झाली. सात एप्रिलपर्यंत या अधिकाऱ्याने रुग्णांवर उपचार केले असल्याने त्याच्याशी संपर्क आलेल्यांच्या शोधासाठी रात्रीच मोहीम सुरू करण्यात आली. दरम्यान शहरातील करोनाबाधितांची संख्या आता ३६ वर पोहोचली आहे.

मागील आठवडय़ात बुधवारी येथे सर्वप्रथम पाच करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यानंतर हा आकडा सातत्याने वाढतच असून दोघांचा मृत्यू झाला आहे. करोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासनाने या रुग्णांच्या संपर्कात आलेले नातेवाईक तसेच अन्य लोकांचा शोध घेऊन त्यांचे अलगीकरण सुरू केले आहे. तसेच त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविले जात आहेत. त्यानुसार मालेगावात वास्तव्यास असलेल्या नामपूर येथील वैद्यकीय अधिकाऱ्याचा एका करोनाबाधित रुग्णाशी संपर्क आल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर या अधिकाऱ्यास तसेच शहरात खासगी व्यवसाय करणाऱ्या त्याच्या डॉक्टर पत्नीला महापालिकेच्या अलगीकरण कक्षात ठेवत त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविले गेले होते. मंगळवारी एकूण ८० अहवाल प्राप्त झाले. त्यात ७५ अहवाल नकारात्मक आले असून जे पाच अहवाल सकारात्मक आले त्यात या डॉक्टर दाम्पत्याच्या समावेश आहे.

दरम्यान, या वैद्यकीय अधिकाऱ्याने नामपूर येथे रुग्णांची तपासणी, उपचार केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तपासणीच्या निमित्ताने त्याच्याशी संपर्क आलेले रुग्ण व अन्य डॉक्टर्स,कर्मचाऱ्यांचा रात्रीच शोध घेत अलगीकरण करण्याची तयारी प्रशासकीय पातळीवरून  सुरू झाली. बुधवारी सायंकाळपर्यंत अशा प्रकारे संपर्कात आलेले सुमारे ४० जण आढळून आले आहेत.

करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी येथील मनमाड चौफुली भागातील जीवन आणि मन्सूरा कॉलेज अशी दोन खाजगी रुग्णालये अधिग्रहित करण्यात आली आहेत. या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी ५० खाटांची व्यवस्था आहे.

लोंढे आवरण्याची आमदारांची सुचना

नामपूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी करोनाबाधित आढळल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांना विलगीकरण केंद्रात भरती कण्याची सूचना आमदार दिलीप बोरसे यांनी तातडीची बैठक घेऊन केली. मालेगावला करोनााबाधित आढळल्यानंतर बागलाणचे नागरिकही धास्तावले होते. या पार्श्वभूमीवर, पाच दिवसांपूर्वीच प्रशासनाने सटाणा येथे पाच ठिकाणी विलगीकरण केंद्र उभारून सज्जता राखली आहे. नामपूरचे वैद्यकीय अधिकारीच बाधित असल्याचे उघड झाल्यानंतर आमदार बोरसे यांनी प्रांत विजयकुमार भांगरे, तहसीलदार जितेंद्र इंगळे, तालुका वैद्यकीय अधिकारी यांची बैठक घेऊन नामपूर गाव पूर्णपणे बंदिस्त करण्याची सुचना केली.  बागलाणमध्ये मालेगावचे लोंढे येत असल्याच्या मोठय़ा प्रमाणात तक्रारी आहेत. पोलीस यंत्रणेने सतर्क राहून हे लोंढे रोखण्याची गरज आहे. लोंढे आल्यास त्याला संबधित पोलीस अधिकारी जबाबदार राहतील, असा इशाराही बोरसे यांनी दिला. बोरसे यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नामपूर गावाची पाहणी करून संपूर्ण गाव बंदिस्त करण्याची तयारी सुरू केली. करोना संशयित रुग्णांसाठी गावालगत विलगीकरण केंद्र उभारण्यासाठी काकडगाव महाविद्यालय इमारत, मराठी शाळा इमारतीची पाहणी करण्यात आली. तसेच ग्रामीण रुग्णालयातील सर्वच वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची तपासणी करून त्यांना विलगीकरण केंद्रात भरती करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.