|| महेश बोकडे

मुंबईत बसून कामाचे मूल्यमापन कसे?

शिक्षकदिनी मुंबईत गौरव करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण खात्याने राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांत सेवा देणाऱ्या विविध महाविद्यालयांतील १४ गुणवंत शिक्षकांची नावे नुकतीच जाहीर केली, परंतु असे करताना या शिक्षकांबाबत बहुतांश महाविद्यालयांच्या प्रशासनाला वैद्यकीय शिक्षण खात्याने एक शब्दही विचारलेला नाही. त्यामुळे मुंबईत बसून या शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापन कसे झाले हा प्रश्न उपस्थित झाला असून आता ही यादीही वादात सापडली आहे.

नागपूरच्या मेडिकल, मेयोसह राज्यात १७ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये आणि तीन शासकीय दंत महाविद्यालये व रुग्णालये वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अखत्यारित येतात. येथे सेवा देणाऱ्या गुणवंत शिक्षकांचा शिक्षकदिनी ५ सप्टेंबरला मुंबईत सत्कार करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण खात्याने घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयांकडून त्यांच्याकडे काम करणाऱ्या चांगल्या शिक्षकांबाबत माहिती गोळा करणे व त्यातून शिक्षकांची पडताळणी होऊन नावे निश्चित होणे अपेक्षित होते, परंतु नागपूरच्या मेडिकल, मेयो आणि शासकीय दंत महाविद्यालयासह यवतमाळ, चंद्रपूरच्या महाविद्यालयांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना साधी विचारणाही झाली नसल्याचे पुढे येत आहे. या शिक्षकांच्या कामगिरीची माहिती स्थानिक प्रशासनालाच असणे शक्य असताना मुंबईत बसून वैद्यकीय शिक्षण खात्याने नावे निश्चित केली कशी, या नियुक्तीसाठी निकष काय होता यासह इतरही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

वैद्यकीय शिक्षण खात्याने निवडलेली नावे उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांची असली तरी या खात्याच्या गोंधळामुळे ही यादी आता वादात सापडली आहे. असा वाद असल्याचे नागपूर, यवतमाळ, चंद्रपूरसह इतरही काही संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर मान्य केले आहे. या विषयावर वैद्यकीय संचालक डॉ. प्रवीण शिनगारे आणि सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

तीनपेक्षा अधिक महाविद्यालयांना डावलले

वैद्यकीय शिक्षण खात्याने सत्कारासाठी निवडलेल्या गुणवंत शिक्षकांच्या यादीत डॉ. प्रवीण जाधव (गोंदिया), डॉ. वैशाली शेलगांवकर (मेयो), डॉ. उदय नारलावार (मेडिकल), डॉ. सुभाष कुंभारे (शासकीय दंत महाविद्यालय), डॉ. राजेश कार्यकर्ते (अकोला), डॉ. शिरूरे (सोलापूर), डॉ. समीर जोशी (पुणे), डॉ. शिवाजी सुक्रे (औरंगाबाद), डॉ. गोरे (लातूर), डॉ. रागिनी पारेख ( मुंबई), डॉ. अरुणकुमार व्यास ( मुंबई), डॉ. ज्योती भावठाणकर ( मुंबई), डॉ. जे. व्ही. तुपकरी ( मुंबई), डॉ. बिराजदार (अंबेजोगाई) यांचा समावेश आहे. अशा प्रकारे प्रत्येक संस्थेतून एका शिक्षकाची निवड केलेली असताना यवतमाळ, चंद्रपूर, धुळ्यासह नागपूरच्या सुपरस्पेशालिटीतून एकही नाव नसल्याने येथे गुणवंत शिक्षक नाहीत काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.