एकाच जागी १५ वर्षे सेवा देणाऱ्या ८९ सहाय्यक प्राध्यापकांची यादी जाहीर

केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाला शिक्षकांच्या बदल्या न करण्याच्या सूचना गेल्या वर्षी मेडिकलमधील एका कार्यक्रमात केल्या होत्या. त्याला हरताळ फासत एकाच ठिकाणी सलग १५ वर्षे सेवा देणाऱ्या राज्यातील ८९ सहाय्यक प्राध्यापकांच्या बदलीची यादी जाहीर केली आहे. त्यातून अनेकांना वगळल्याचा आरोप होऊ लागला आहे.

नुकतीच वैद्यकीय सचिव पदाची जवाबदारी मेधा गाडगीळ यांच्याकडून राजगोपाल देवरा यांच्याकडे आली. वैद्यकीय शिक्षण विभागाकडून राज्यातील १६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतून सलग १५ वर्षे सेवा देणाऱ्या सहाय्यक प्राध्यापकांना त्यांची बदलीच्या ठिकाणाबाबद इच्छुकता विचारली. ५ मे २०१७ रोजी ८९ सहाय्यक प्राध्यापकांची बदल्यांची यादी जाहीर केली. तरी त्यात राज्याच्या विविध संस्थेत सगल १५ वर्षे सेवा देणाऱ्या काही शिक्षकांची नावे वगळल्याची जोरदार चर्चा वैद्यकीय वर्तुळात आहे. बदलीचा धसका घेत मुख्यमंत्र्यांसह विविध खात्याचे मंत्री वा वैद्यकीय शिक्षण विभागातील बडय़ा अधिकाऱ्यांशीही अनेकांनी संपर्क वाढवला आहे.

गडकरींच्या सूचनेला हरताळ

ट्रामा केयर सेंटरच्या २८ मे २०१६ रोजी झालेल्या उद्घाटनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त सचिव मेघा गाडगीळ, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय संचालकांसह वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत गडकरींनी वैद्यकीय शिक्षण विभागाला शिक्षकांच्या बदली संबंधात बऱ्याच सूचना केल्या होत्या. गडकरींनी म्हणाले होती की, डॉक्टरांचा बदल्यांना विरोध असतो. बदल्या होताच ते विविध पक्षाच्या नेत्यांना किंवा अधिकाऱ्यांना भेटतात. हा प्रकार बंद करण्याकरिता शासनाने डॉक्टरांच्या बदल्यांबाबत धोरण निश्चित करावे. त्यामुळे डॉक्टर पूर्ण क्षमतेने सेवा देतील. गडकरींच्या सूचनेनंतर मागील वर्षी फारशा बदल्याही झाल्या नाही.

..तर शिक्षक सोडून जातील

वैद्यकीय शिक्षण विभागात सहाय्यक प्राध्यापकांसह सगळ्याच शिक्षकांची कमतरता असून बदल्यांमुळे अनेक जण स्वेच्छानिवृत्ती घेण्याची शक्यता आहे. तेव्हा विनंतीवरूनच वैद्यकीय शिक्षकांची बदली व्हायला हवी. सक्तीने बदली केल्यास व डॉक्टरांनी नोकरी सोडल्यास त्याचा रुग्णांनाच फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर बदलीला विरोध होत आहे.

डॉ. समीर गोलावार, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटना, मेडिकल.

नियमानुसारच प्रक्रिया

वैद्यकीय शिक्षण विभाग नितीन गडकरींसह सगळ्या लोकप्रतिनिधींच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या विकासाशी संबंधित सूचनांचा आदरच व पालनही करते. सहाय्यक प्राध्यापकांच्या बदलीसंदर्भातील प्रक्रिया ही नियमानुसार आहे. गडकरींच्या सूचनांचे पालनही करण्यात आले आहे. यादी पारदर्शकपद्धतीने करण्यात आली आहे. काही तक्रारी आल्यास चौकशी केली जाईल.

डॉ. प्रवीण शिनगारे, वैद्यकीय संचालक, मुंबई