• भांडारगृहात पाणी शिरले
  • गरीब रुग्णांची गैरसोय

मेडिकलच्या औषध भांडारामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे पाणी तुंबल्याने दोन दिवसांपासून विविध वार्डाना होणारा औषध पुरवठा प्रशासनाकडून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे गरीब रुग्णांना बाहेरून औषध खरेदी करावे लागत आहे.

मेडिकलमध्ये १,७०० हून जास्त खाटा असून रोज किमान १,२०० ते १,३०० रुग्ण येथे दाखल होतात. येथील बाह्य़रुग्ण विभागातही रोज सुमारे ३ हजार रुग्णांवर उपचार होतो. शासनाकडून येथील बीपीएल रुग्णांना मोफत औषध उपलब्ध केले जाते. औषध ठेवण्यासाठी भांडारगृहाची व्यवस्था आहे.

तळमजल्यावर असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात त्यात पाणी शिरते. ते काढण्याकरिता येथे पंपाची व्यवस्था आहे. मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे यंदाही तेथे पाणी शिरले. ते बाहेर काढण्याकरिता प्रयत्न झाले नाही. त्यामुळे दोन दिवसांपासून सर्वच वार्डातील औषध पुरवठाही थांबवण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णांना बाहेरून औषध खरेदी करावे लागते. प्रशासनाच्या अव्यवस्थेचा भरुदड रुग्णांवर बसत आहे.

दरम्यान, भांडारगृहात लक्षावधींच्या सलाईन व इतर काही औषधे भिजल्याची माहिती आहे. ही बाब लक्षात आल्यावर ते सुकवण्यासाठी ठेवण्यात आले, परंतु ते खराब होण्याची शक्यता अधिक आहे.

नऊ कोटींच्या औषध भांडाराचे काम संथ

मेडिकलमध्ये ९ कोटी २१ लाख खर्चून नवीन औषधालय बांधण्याचे काम फेब्रुवारी २०१४ मध्ये सुरू झाले. तीन माळ्यांची ही इमारत असून प्रत्येक माळ्यावर औषध साठवणुकीसाठी वातानुकूलित कक्षाची व्यवस्था केली जाणार आहे. मात्र, इमारतीचे काम संथपणे सुरू आहे. ते आणखी किती वर्षे चालणार? हा प्रश्न नागपूरकर विचारत आहे. त्यातच मेडिकलमधील सध्याचे औषध भांडार हे ६० वर्षांहून जास्त जुने असून तेथे नित्याने पाणी तुंबते. त्यानंतरही प्रशासनाकडून तातडीने ही वास्तू तयार करण्याकडे दुर्लक्ष आहे, हे विशेष.

मेडिकलच्या औषध भांडारात पाणी शिरल्यामुळे मंगळवारी दुपारनंतर विविध वार्डात औषधांचा पुरवठा बंद करण्यात आला होता, परंतु गुरुवारी पाणी बाहेर काढून पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. येथील औषधे पाण्यात भिजून खराब झाले नाही. औषध भांडार स्वच्छ होईस्तोवर औषध रुग्णांना देणे धोकादायक असते.

डॉ. चक्रवर्ती, औषध भांडार, मेडिकल, नागपूर.