अमेरिकेतील मेहता फाऊंडेशनकडून मेडिकलची पाहणी

नागपूर : उपराजधानीतील सिकलसेल एक्सलेंस सेंटरसाठी अमेरिकेतील मेहता फाऊंडेशनने शासनाला १२० कोटी रुपये मदत देऊ केली होती. परंतु गुरुवारी या फाऊंडेशनची तीन सदस्यीय चमू मेडिकलला पोहोचली. प्रस्तावित जागेसह संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर त्यांनी सेंटरसाठी ४० कोटींची मदत देऊ केली आहे. त्यामुळे प्रकल्प सुरू होण्याआधीच त्याच्या मदतीला ८० कोटींची कात्री लागली आहे.

विदर्भात सिकलसेलग्रस्तांची संख्या जास्त असल्यामुळे अनिवासी भारतीय उद्योजक मेहता यांनी मेहता फाऊंडेशनच्या माध्यमातून मेडिकलमध्ये प्रस्तावित सिकलसेल इन्स्टिटय़ूटसाठी १२० कोटी रुपये देऊ  केले होते. त्यात केंद्र सरकारच्या अखत्यारित आयसीएमआरसह इतर संस्थांकडून काही निधी मिळवून ही संस्था नागपुरात सुरू होणार होती. या प्रकल्पाबाबत मेहता फाऊंडेशनने शासनाला या प्रकल्पाबाबत सविस्तर अहवाल मागितला होता.

गुरुवारी मेहता फाऊंडेशनचे राहुल मेहता, अंकुर दयाल, ब्रेनाड लुकसिच हे  मेडिकलला पोहोचले. त्यांनी प्रशासनाकडून सेंटरसाठी प्रस्तावित साडेतीन एकर जागा, त्यावर प्रस्तावित प्रकल्पाची माहिती घेत तातडीने सविस्तर अहवाल देण्याबाबत सूचना दिली. या सेंटरबाबत तीन ते चार दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन प्रस्तावाला अंतिम स्वरूप देण्याबाबत निर्णय झाला.

१६० कोटींचा पेच

सिकलसेल एक्सलेंस सेंटरसाठी सुमारे २०० कोटी रुपयांची गरज आहे. या सेंटरमध्ये स्वतंत्र बाह्य़रुग्ण विभाग, आंतररुग्ण विभागासह रुग्णांच्या विविध तपासणीची स्वतंत्र सोय राहणार आहे. सिकलसेलच्या रुग्णांसाठी आवश्यक पेशी प्रत्यारोपणासह इतर सोयही येथे राहणार असल्यामुळे त्याचा येथील सिकलसेलग्रस्तांना लाभ शक्य आहे, परंतु या सेंटरला मेहता फाऊंडेशनने ४० कोटी रुपये मदत दिल्यावरही १२० कोटी रुपये येणार कुठून? हा पेट मात्र कायम आहे. शासनाकडून हा निधी सामाजिक न्याय विभागासह आदिवासी विभागाकडून वळता करण्याचा प्रयत्न असल्याची सूत्रांची माहिती आहे.