वाघांच्या शिकारीमुळे काही वर्षांपूर्वी हादरलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आता पुन्हा एकदा शिकारी टोळक्यांचा शिरकाव सुरू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी हतरू-रायपूर मार्गावर चौराकुंड, हरिसालजवळ सुमारे ३०-४० व्यक्ती बंदुकींसह संशयास्पद स्थितीत वावरताना दिसून आल्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्प पुन्हा एकदा शिकाऱ्यांच्या रडारवर तर नाही ना, अशी दाट शंका व्यक्त केली जात आहे.

तीन ते चार वर्षांपूर्वी मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या एकापाठोपाठ एक शिकारी उघडकीस आल्याने संपूर्ण मेळघाट हादरला होता. यातील बहुतांश शिकाऱ्यांना पकडण्यात आणि त्यांना शिक्षा देण्यात मेळघाट वन्यजीव गुन्हे शाखा यशस्वी ठरली. त्यानंतर शिकाऱ्यांच्या मेळघाटातील वावरास बराच पायबंद बसला. मात्र, दोन दिवसांपूर्वी वन्यजीव अभ्यासक या परिसरात फिरत असताना गोंड व भिल्ल जमातीची माणसे बंदुकीसह या परिसरात फिरताना दिसली. अभ्यासकांनी त्यांना विचारपूस करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना बंदुकीचा धाक दाखवून पळवून लावण्यात आले. त्यांची संख्या अधिक आणि वन्यजीव अभ्यासक एका हाताच्या बोटावर मोजण्याइतके असल्याने त्यांनी पळ काढला. तेथून दोन किलोमीटर अंतरावर त्यांना वनविभागाचे वाहन दिसल्यावर वाहनातील अधिकाऱ्याला ही माहिती दिली. वाहनात वायरलेस सुविधा असतानाही त्या अधिकाऱ्याने वायरलेसचा वापर करून व्याघ्र संरक्षण दलाला पाचारण केले नाही किंवा त्या बंदुकधाऱ्यांना रोखण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही. याउलट, वन्यजीव अभ्यासक सेमाडोहपर्यंत आलेले असताना त्यांच्या मागे मागे त्या अधिकाऱ्याचेही वाहन आले. या संपूर्ण घटनेसंदर्भात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व मुख्य वनसंरक्षक डॉ. दिनेश त्यागी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या प्रकरणाची चौकशी करीत असल्याचे सांगितले.

मध्यप्रदेशातील शिकारी जमातीचा धोका

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात काही वर्षांपूर्वी झालेल्या शिकारी या मध्यप्रदेशातील शिकारी जमातीनेच केल्याचे स्पष्ट झाले होते. मध्यप्रदेशातून आलेल्या या शिकारी जमातीने पश्चिम मेळघाटमध्ये त्यांचा डेरा जमवला व गाव तयार केले. शिकारीच्या घटना उघडकीस आल्यानंतर आणि आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर ते या डेरा जमवलेल्या गावातीलच असल्याचे स्पष्ट झाले होते. दोन दिवसांपूर्वी वन्यजीव अभ्यासकाला दिसून आलेली ही माणसेसुद्धा याच वेषातील असल्याने मेळघाट व्याघ्र प्रकल्पावर शिकाऱ्यांचे सावट घोंगावू लागले आहे.

‘तो’ अधिकारी कोण?

वन्यजीव अभ्यासकांनी संपर्क साधलेल्या त्या अधिकाऱ्याने स्वत:चे नाव सहाय्यक वनसंरक्षक एस.एस. पवार असे सांगितले. मात्र, सिपना क्षेत्रात या नावाचा कुणीही सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी नाही. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व मुख्य वनसंरक्षक डॉ. दिनेश त्यागी यांनीही त्याला पुष्टी दिली, त्यामुळे वनविभागाचे वाहन हाताळणारा हा व्यक्ती कोण, कनिष्ठ दर्जाच्या कर्मचाऱ्याने तर स्वत: अधिकारी म्हणून सांगितले नाही ना, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.