‘जस्टीस फॉर दीपाली’ समूहाच्या सदस्यांचे परखड मत; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

नागपूर : महिला आयोग, विशाखा समितीकडून आता महिलांना न्याय मिळेलच याची खात्री देत येत नाही. कारण, असे आयोग आणि समित्यांचे अध्यक्षपद हे कायद्याचे ज्ञान, महिलांच्या समस्येची जाणीव असणाऱ्यांना नव्हे तर राजकीय आशीर्वादाने मिळत असते. अशावेळी त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करणार तरी कशी, असे परखड मत ‘जस्टीस फॉर दीपाली’ समूहाच्या  अरुणा सबाने, अ‍ॅड. रेखा बारहाते, प्रज्वला तट्टे यांनी व्यक्त केले.

हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर एकू णच नोकरी करणाऱ्या स्त्रियांचे अनेक प्रश्न समोर येत आहेत. त्या पाश्र्वभूमीवर त्यांनी लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. एका महिला अधिकाऱ्याच्या आत्महत्येतून पुन्हा एकदा पुरुषी मानसिकता, पुरुषी अहंकार समोर आला आहे. अलीकडच्या काळात महिला आयोगाच्या एकू णच कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. आयोगाकडे गेल्यावरही महिलेला न्याय मिळेलच याची शाश्वती नाही. जिथे अध्यक्षपदाचे निकषच योग्य नाहीत तेथे न्यायाची अपेक्षा कशी करणार? महिला आता स्वतंत्र झाल्या आहेत. त्यांचे निर्णय घेण्यास त्या सक्षम आहेत. पण अजूनही पुरुषांना वाटते की महिलांनी त्यांना विचारायला हवे. मग तो कार्यालयातील सहकारी किं वा वरिष्ठ असो, नाहीतर घरातील पुरुष. पुरुषी मानसिकतेला थोडाही धक्का लागला तर त्यांना तो सहन होत नाही. मनु:स्मृतीत लग्नाआधी वडील, लग्नानंतर नवरा आणि म्हातारपणात मुलाच्याच छत्रछायेत राहण्यास शिकवण्यात आले आहे. हीच मनु:स्मृती आजही जिवंत असल्याचे या घटनेने दाखवून दिले आहे.  दीपाली पश्चिम महाराष्ट्रातील आणि विदर्भात नोकरीच्या ठिकाणी तिने आत्महत्या के ली. ज्या जिल्ह्य़ात तिने आत्महत्या के ली, त्या जिल्ह्य़ात चार-चार लोकप्रतिनिधी आहेत. त्यानंतरही तिला न्याय न मिळता आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागणे ही खेदाची बाब आहे.

या घटनांची पुनरावृत्ती टाळायची असेल तर विशाखा समिती, महिला आयोग राजकीय विळख्यातून सोडवून त्याचे बळकटीकरण करावे लागेल, असे मत ‘जस्टीस फॉर दीपाली’ समूहाच्यावतीने अरुणा सबाने व अ‍ॅड. रेखा बारहाते, प्रज्वला तट्टे यांनी मांडले.

रेड्डी यांना अटक व्हायला हवी

या प्रकरणात निलंबित क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी हे ही निलंबित उपवनसंरक्षक शिवकु मार यांच्याइतके च दोषी आहेत. त्यामुळे जोपर्यंत त्यांना सहआरोपी करुन शिक्षा होत नाही, तोपर्यंत पुरुषांना वचक बसणार नाही. त्यामुळे  रेड्डी यांना अटक व्हायला हवी.

– अरुणा सबाने.

महिलांना कणखर बनावे लागेल

दीपाली चव्हाणच्या आत्महत्येचे वाईटही वाटते आणि संतापही येतो. दीपालीने तिच्या पातळीवर पुरेपूर प्रयत्न के ले, पण तरीही अनेक मार्ग होते, ज्यातून ती स्वत:ची सुटका करून घेऊ शकली असती. तरीही या घटनेतून एकच वाटते की आता आम्हाला आमच्या मुलींना मानसिक, शारीरिक पातळीवर कणखर बनवायला हवे.

– अ‍ॅड. रेखा बारहाते.