महिनाभरात निर्णय अपेक्षित

नागपूर : नागपूरच्या लगतच्या शहराकरिता ब्रॉडगेज मेट्रो सुरू प्रस्तावावर अद्याप रेल्वेने काहीच पावले टाकले नाही, परंतु नागपूर विभागात त्याला पर्याय म्हणून मेमू ट्रेन सुरू करण्याचा विचार सुरू आहे. एक महिन्यात याबाबत निर्णय अपेक्षित आहे.

महामेट्रो आणि मध्य रेल्वे यांच्यात ब्रॉडगेज मेट्रोबाबत जुलै २०१८ ला सामंजस्य करार करण्यात आला. परंतु तेव्हापासून त्यासंदर्भात रेल्वे तसूभरही पुढे सरकलेला नाही. त्या उलट ब्रॉडगेज मेट्रोपेक्षा मेमू ट्रेन सुरू करण्याचा विचार करीत आहे. तत्पूर्वी, पॅसेंजर ट्रेन ऐवजी मेमू ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. त्यावर मुंबईत मुख्यालयात अंतिम निर्णय महिनाभरात होण्याची शक्यता आहे. हीच मेमू ट्रेन पुढे ब्रॉडगेड मेट्रो म्हणून वापरण्याचा पर्याय उपलब्ध  आहे. मेमू ट्रेनमध्ये वातानुकूलित यंत्रणा आणि गती वाढण्याची चाचणी काही ठिकाणी सुरू झाली आहे. ही गाडी ब्रॉडगेज मेट्रोला म्हणून उत्तम पर्याय ठरू शकतो, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे.

ब्रॉडगेज मेट्रोसाठी मेट्रो रेल्वे उपलब्ध होणे, त्यानुसार फलाट बांधणे, सिग्नलिंग यंत्रणा बसवणे आणि मेट्रो स्थानक विकसित करणे अशा अनेक बाबींची तयारी करावी लागते. मेट्रोचे विशेष डिझाईन महानगरासाठी असते. त्यासाठी वेगळी मार्गिका असावी लागते. मेट्रोचे ट्रॅक भुयारी किंवा जमिनीपासून उंचीवर असतात. त्याऐवजी उपलब्ध पायाभूत सुविधांचा वापर करून मेमू ट्रेन चालणे अधिक सोईस्कर आहे, असे रेल्वेला वाटते.

रेल्वेचे रुळ सामान्यत: जमिनीवरच असतात.  रेल्वे लांब पल्ल्यासाठी तसेच कमी अंतराच्या शहरामध्ये पॅसेंजर गाडय़ा चालवण्यासाठी आहे. या पॅसेंजर ट्रेन ऐवजी आता मेमू ट्रेन सुरू करण्यात येत आहे. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मेमू ट्रेन सुरू देखील केली आहे. मध्य रेल्वे लवकर त्यावर निर्णय घेत आहे.

ब्राडगेज मेट्रो गडकरींची संकल्पना

शहरातील प्रवाशांनी मेट्रो मिळाली, पण नागपूरच्या आजूबाजूच्या लोकांना नागपुरात सहज-जा करता यावे म्हणून रेल्वेच्या रुळांवर मेट्रो सुरू करण्याची कल्पना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडली होती व त्यासाठी वर्धा, काटोल, रामटेक, भंडारा या मार्गाची निवड करण्यात आली. त्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.

अशी आहे मेमू ट्रेन

पॅसेंजर ट्रेनपेक्षा मेमू ट्रेनची (मेनलाईन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) गती अधिक आहे. मेट्रोप्रमाणे ही गाडी थांबा घेतल्यानंतर काही संकेदात गतीने पुढे जाते. ही गाडी कमीत कमी ५० किलोमीटर प्रतितास धावू शकते. या गाडीच्या डब्यांची रचना मेट्रोप्रमाणे असते. परंतु ती ब्रॉडगेज मार्गिकेवरून धावते.

महामेट्रो आणि मध्य रेल्वे यांच्यात ब्रॉडगेज मेट्रो कराराबाबत करार झाला. त्यासंदर्भात सध्यातरी काहीही अद्ययावत माहिती नाही. मात्र, नागपूर विभागात मेमू ट्रेन चालवण्याचा विचार सुरू असून महिनाभरात निर्णय होईल. त्यासंदर्भातील प्रक्रिया मुख्यालयाच्या पातळीवर सुरू आहे, पण मेट्रोच्या कराराशी त्याचा संबध नाही.

– एस.जी. राव, सहायक वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे.