18 October 2019

News Flash

फिनाईल प्यायल्याने मनोरुग्णाचा मृत्यू!

उपचाराचा एक भाग म्हणून या रुग्णाला मध्यंतरी विजेचे शॉकही दिले गेले होते.

प्रतिनिधिक छायाचित्र

प्रशासकीय व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

नागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयातील एका मनोरुग्णाने उपचार सुरू असलेल्या वार्डातच फिनाईल  पिल्याने त्याचा मृत्यू झाला. या रुग्णाने फिनाईल स्वत पिले की त्याला कुणी पाजून त्याची हत्या केली, हा प्रश्न कायम असून या घटनेमुळे पुन्हा प्रादेशिक मनोरुग्णालयातील व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

प्रशांत मनोहर साकोडे (४२) रा. महाल, नागपूर असे मृताचे नाव आहे. प्रशांत हा गंभीर गटातील (क्रिझोफेनिया) मनोरुग्ण होता. तो कुणालाही शिविगाळ करायचा, कुणाच्याही मागे धावायचा. शहर पोलिसांनी न्यायालयाच्या सूचनेवरून १९ मार्च २०१९ रोजी त्याला प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले. विविध वैद्यकीय तपासणीत त्याला कमी रक्तदाबासह इतरही त्रास असल्याचे निदान झाले. गेल्या महिन्यात त्याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावर मनोरुग्णालयातील वार्ड क्रमांक ८ मध्ये उपचार सुरू होते. या वार्डात सध्या ४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचाराचा एक भाग म्हणून या रुग्णाला मध्यंतरी विजेचे शॉकही दिले गेले होते. नेहमीप्रमाणे रविवारी या रुग्णाच्या वार्डातील स्वच्छतागृहात चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली. परंतु फिनाईल तेथेच राहिले. काही वेळाने हे फिनाईल पिल्यामुळे प्रशांत ओकारी करू लागला. ही माहिती तेथील इतर डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना कळताच खळबळ उडाली. त्याला तातडीने मेडिकलमध्ये हलवले. परंतु उपचारादरम्यान आज मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात आला. न्यायवैद्यक अहवालावरूनच या मृत्यूचे नेमके कारण कळू शकेल. या वार्डात डॉक्टरांसह चतुर्थश्रेणी कर्मचारी सतत हजर राहत असतांना रुग्णाने फिनाईल पिले कसे, हा खरा प्रश्न आहे. २०१६ मध्ये या रुग्णालयात एका रुग्णाच्या आकस्मिक मृत्यूची नोंद झाली होती. शवविच्छेदन अहवालात त्याचा गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. येथील काही सीसीटीव्ही कॅमेरेही बंद आहेत, हे विशेष.

वर्षभरात ३० मृत्यू

प्रादेशिक मनोरुग्णालयात १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या आर्थिक वर्षांमध्ये ३० मनोरुग्णांचा मृत्यू झाला आहे. १ एप्रिल २०१९ नंतर मनोरुग्णालयात झालेला हा पहिला मृत्यू आहे. याबाब एका अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्याने नाव न टाकण्याच्या अटीवर रुग्णाने फिनाईल पिले असले तरी त्याच्या प्राथमिक शवविच्छेदन अहवालात इतरही काही बाबी आढळल्याचे सांगितले. मृत्यूला इतरही कारण असण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला.

First Published on May 15, 2019 3:43 am

Web Title: mentally challenged man death after consuming phenyl