चार चाकी, दुचाकी रॅलीद्वारे सरकारचा निषेध; दुकानांची वेळ वाढविण्याची मागणी
नागपूर : बाजारपेठांच्या वेळा वाढवून देण्यासाठी मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही ‘सरकार जगाओ वाणिज्य बचाओ संघर्ष समिती’ तर्फे विविध व्यापारी संघटना रस्त्यावर उतरल्या. दुपारी शहरातील हिस्लॉप महाविद्यालयाच्या चौकातून कार आणि बाईक रॅली काढून व्यापाऱ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत रोष व्यक्त केला.

नागपुरात करोनाची स्थिती आटोक्यात असून करोनाच्या निर्धारित केलेल्या स्तरात शहर स्तर एक मध्ये मोडते. तरीही येथे तिसऱ्या स्तराचे निर्बंध लावण्यात येत आहेत. अशात व्यापाऱ्यांना आपली दुकाने दुपारी चार वाजता बंद करावी लागत असून या अवधीत व्यवसाय होत नाही. त्यामुळे स्तर एकचे निर्बंध लावा आणि बाजारपेठा रात्री आठपर्यंत सुरू ठेवा अशी मागणी सरकार जगाओ वाणिज्य बचाओ संघर्ष समितीतर्फे करण्यात आली आहे.

त्यासाठी व्यापाऱ्यांनी  सोमवारी दुपारी संविधान चौकात हजारोच्या संख्येने जमा होऊन सरकारच्या विरोधात फलक घेऊन घोषणाबाजी केली होती. तसेच मोर्चा जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांच्या कार्यालयावर नेऊन निवेदन दिले होते. मात्र दुसऱ्या दिवशी देखील कार व बाईक रॅली काढून व्यापाऱ्यांनी र्निबधांचा निषेध कायम ठेवला.

मंगळवारी दुपारी एक वाजता  हिस्लॉप महाविद्यालयाच्या चौकातून कार आणि बाईक रॅली काढण्यात आली. यामध्ये चेम्बर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अ‍ॅण्ड ट्रेडचे अध्यक्ष दिपेन अग्रवाल, नाग विदर्भ चेम्बर्स ऑफ काँमर्स, नागपूर रेसिडेन्शियल ओसिएशन, कोचिंग क्लासेस असोसिएशन, कॉम्प्युटर संघटना, हॉटेल इंडस्ट्रीज असोसिएशन, नागपूर चेम्बर्स ऑफ कॉमर्स लिमिटेड, गांधीबाग, इतवारी, बर्डीच्या कपडा व्यापारी संघटनांसह इतर प्रभावित झालेल्या सर्व दुकानदारांच्या संघटना सहभागी झाल्या. यावेळी शेकडो व्यापाऱ्यांनी फलक हातात घेऊन दुचाकीवर आणि चारचाकी रॅली शहराच्या प्रमुख्य मार्गावरुन काढली. लॉ कॉलज चौक, कॉफी हाऊस चौक, शंकरनगर, पंचशील चौक, मेहाडिया चौक, मोक्षधाम, बद्यनाथ चौक, मेयो हॉस्पिटल चौकातून ही रॅली व्हेरायटी चौकात पोहोचली. तेथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यापर्ण करण्यात आले. त्यानंतर संयोजक दिपेन अग्रवाल यांनी व्यापाऱ्यांना संबोधित करत बाजारपेठांवर वेळेच्या र्निबधामुळे होणाऱ्या नुकसानीबद्दल माहिती दिली. यानंतर रॅलीचा समारोप झाला.