नाग विदर्भ ऑफ चेम्बर्सचा कठोर निर्बंधांना विरोध

नागपूर : करोनामुळे आधीच हॉटेल व्यवसायिक आणि व्यापारी अडचणीत आले आहे. त्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. या क्षेत्राशी निगडित हजारो कामगार बेरोजगार झाले असताना पुन्हा आमची प्रतिष्ठाने बंद करण्याची वेळ आली आहे. व्यापारी कर्जात अडकले आहेत. यामुळे आता व्यापारी व हॉटेलचालक करोनामुळे नाही तर आर्थिक अडचणीमुळे मरणार आहेत. अशा भावना व्यक्त करीत हॉटेल चालकांनी व व्यापाऱ्यांनी मिनी टाळेबंदीला विरोध दर्शवला आहे.

शहरात दररोज चार हजारावर करोनाबाधित आढळत असून दररोज साठ रुग्णांचा मृत्यू होत आहे. अशी भयावह स्थिती संपूर्ण राज्यात आहे. वाढत्या बाधितांची संख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात मिनी टाळेबंदीसह कडक निर्बंध जाहीर केले आहेत. यात जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने बंदी राहतील.

यामध्ये पुढील पंचवीस दिवस मॉल, सलून, बार, ब्युटी पार्लर, सिनेमागृह, बाजरपेठा, क्रीडा संकुले आदी गर्दी होणारी ठिकाणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर हॉटेलात बसून भोजनाला मज्जाव करण्यात आला आहे. मात्र करोना काय हॉटेलमधूनच पसरतो काय असा सवाल हॉटेल चालकांनी केला आहे. व्यापारीही या निर्बंधाच्या विरोधात आहेत.

नाग विदर्भ ऑफ चेम्बर्सने पत्रक काढून या मिनी टाळेबंदीचा कडक विरोध केला आहे. व्यापार व हॉटेल क्षेत्राशी निगडित लाखो कामगारांवर उपासमारीची वेळ आणणारा हा निर्णय असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. या निर्णयामुळे काही कामगार आपल्या गावाकडे कायमचे जात आहेत. अशात कुशल कामगार आणायचे कुठून, असा सवाल हॉटेल चालक करत आहेत. लाखो रुपयांची गुंतवणूक करून हॉटेलमधून केवळ पार्सल सेवा देणे शक्य नाही. असा व्यवसाय होत नार्ही. किंबहुना ते परवडणारे नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

राज्य सरकारने आमची प्रतिष्ठाने सुरू व बंद करण्याच्या वेळा निर्धारित करून व्यवसायाला चालना द्यायला हवी होती. आम्ही सर्व नियमांचे पालन करण्यास तयार आहोत. तसेच माझे दुकान माझी जबाबदारी हा उपक्रम आम्ही राबत आहोत. त्यामुळे लाखो लोकांच्या बेरोजगारीचा विचार करून सरकारने लवकर आम्हालाही व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी, असे नाग विदर्भ चेम्बर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आश्विन मेहाडिया यांनी सांगितले.