शुल्क भरण्यासह अनेक नोंदणीबाबत कर्मचारीच अनभिज्ञ

नागपूरच्या प्रादेशिक परिवहन विभागासह राज्यातील अनेक कार्यालयात वाहन-१ हे ‘सॉफ्टवेअर’ बदलून वाहन-४ हे नवीन ‘सॉफ्टवेअर अपलोड’ झाले असून त्याचे प्रात्यक्षिकही सुरू आहे. या ‘सॉफ्टवेअर’बाबत परिवहन विभागाकडून निवडक कर्मचाऱ्यांना दिलेले प्रशिक्षण अपूर्ण असून त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये स्वीकारलेल्या शुल्कासह इतर बऱ्याच नोंदीबाबत गोंधळ असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकारामुळे परिवहन विभाग नवीन ‘सॉफ्टवेअर’बाबत कर्मचाऱ्यांना देत असलेल्या एकाच दिवसाच्या प्रशिक्षणावर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

केंद्र सरकारच्या परिवहन विभागाने देशभरातील दुचाकी, चारचाकीसह सगळ्याच संवर्गातील वाहनांची नोंदणी एकाच ‘सॉफ्टवेअर’मध्ये करण्याचे आदेश दिले आहे. या प्रकाराने गैरमार्गाने वाहने विक्री होऊन त्या चुकीच्या व्यक्तीच्या हाती पडण्याचे प्रकार कमी होण्यास मदत होईल. याकरिता महाराष्ट्राच्या परिवहन विभागाने राज्यभरातील प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन विभागात वाहन-४ हे अद्यावत ‘सॉफ्टवेअर’ बसवले आहे. १६ जानेवारीपासून या ‘सॉफ्टवेअर’ची प्रात्यक्षिक नागपूरसह राज्याच्या अनेक कार्यालयात घेण्यात येत आहे. त्यात प्रशासनाला काहीही अडचण येत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे असले तरी प्रत्यक्षात या ‘सॉफ्टवेअर’बाबत कर्मचाऱ्यांना दिलेले प्रशिक्षण हे अपूर्ण पडत असल्याचा प्रकार पुढे येत आहे.

नागपूरच्या प्रादेशिक परिवहन विभागासह काही कार्यालयात या ‘सॉफ्टवेअर’मध्ये संबंधित वाहन चालकाकडून घेण्यात आलेल्या शुल्काची नोंदणी संबंधित कर्मचाऱ्यांकडून केल्यावर ती योग्य न दिसणे, ‘सॉफ्टवेअर’मधील बरेच ‘फिचर’ कुठे आहे, याची कर्मचाऱ्यांनाच माहिती नसणे, ‘सॉफ्टवेअर’मध्ये विविध नोंदी करण्याकरिता काय करावे यासह इतरही अनेक बाबी अद्यापही बऱ्याच कर्मचाऱ्यांना माहिती नसल्याचे पुढे येत आहे. या प्रशिक्षणाकरिता नागपूरच्या प्रादेशिक परिवहन विभागासह उपप्रादेशिक परिवहन विभागातून पुणे येथे ९ जानेवारीला ५ ते ६ जणांना पाठवण्यात आले होते. एकाच दिवसाचे प्रशिक्षण असल्याने बऱ्याच व्यक्तींना परिपूर्ण माहितीच झाली नाही. तेव्हा दिले जाणारे हे प्रशिक्षणच अपूर्ण असल्याचा प्रकार पुढे येत आहे.

राज्यभरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात लागणारे हे ‘सॉफ्टवेअर’ सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांशी निगडीत असल्याने ते हाताळण्याचे प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. तेव्हा ते पूर्णपणे समजण्याकरिता राज्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयाने जास्त दिवसाचे प्रशिक्षण आयोजित करण्याची गरज आहे.

परंतु एकाच दिवसाचे प्रशिक्षण झाल्याने ते बऱ्याच कर्मचारी, अधिकाऱ्यांना कळत नसल्याने त्याचा फटका अप्रत्यक्ष सामान्य नागरिकांनाही बसतो. या प्रकाराने हे ‘सॉफ्टवेअर’ पूर्णपणे सुरू करण्याकरिता बरेच दिवस लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या विषयावर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी काहीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यास टाळले. परंतु नाव न सांगण्याच्या अटीवर काहींनी त्रास होत असल्याची कबुली दिली.