नोव्हेंबर महिना खगोलप्रेमींसाठी पर्वणी असून या महिन्यात वेगवेगळ्या तारखांना उल्का वर्षांव पाहता येणार आहे. पाच नोव्हेंबरला दक्षिण टोरिड उल्कावर्षांव, १२ नोव्हेंबरला उत्तर टोरिड उल्का वर्षांव तर १६, १७ नोव्हेंबरला लियोनिड उल्कावर्षांव आणि २२ नोव्हेंबरला मोनोसेटाईड उल्कावर्षांव पाहायला मिळणार आहे.

सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या पाच तारखेदरम्यान दरवर्षी दक्षिण टोरिड उल्कावर्षांव पाहायला मिळतो, पण सर्वोच्च उल्का या चार आणि पाच नोव्हेंबरला दिसतात. ‘एकने’ ह्य धुमकेतूच्या धुळीमुळे हा उल्कावर्षांव पाहायला मिळतो. पृथ्वी जेव्हा या धूमकेतूच्या धूळीतून जाते तेव्हा अवकाशातील धूलीकण गुरुत्व शक्तीमुळे आकर्षित होऊन पृथ्वीकडे येतात. मात्र, वातावरणात येताच जळून जातात. याच प्रक्रियेतून उल्कावर्षांव दिसतो आणि त्याला तारा तुटणे असे म्हणतात. पाच नोव्हेंबरला वृषभ राशीत टोरिड तारासमूहात मध्यरात्रीनंतर आपल्याकडे हा उल्कावर्षांव दिसणार आहे. त्यासाठी दुर्बिणची गरज नसून साध्या डोळ्यांनी देखील तो पाहता येणार आहे. उत्तर टोरिड उल्कावर्षांव यावर्षी १२ नोव्हेंबरला पाहायला मिळणार आहे. हा उल्कावर्षांव २० ऑक्टोबर ते दहा डिसेंबरदरम्यान पाहायला मिळतो. अधिक संख्येने उल्का पाहण्याची संधी १२, १३ नोव्हेंबरला असते. हा वर्षांव देखील टोरस तारासमूहात पाहायला मिळतो. ‘एकने’ धुमकेतू तुटून तयार झालेल्या २००४ टीजी १० या लघु ग्रहाच्या धुळीमुळे हा उल्कावर्षांव दिसतो. या उल्कावर्षांवाचे वैशिष्ट्य म्हणजे नोव्हेंबर महिन्यात फायरबाल उल्का पाहायला मिळतात. हा वर्षांव सुद्धा टोरिड तारासमूहात वृषभ राशीत मध्यरात्रीनंतर पाहायला मिळतो. जगप्रसिद्ध लियोनिड उल्कावर्षांव दरवर्षी सहा ते ३० नोव्हेंबरदरम्यान दिसतो, पण सर्वात जास्त उल्का दिसण्याचा कालावधी हा १६, १७ नोव्हेंबर असतो. कारण पृथ्वी टेंपल टटल धुमकेतूने मागे टाकलेल्या जास्त संख्येने असलेल्या धुलीकनातून जाते. यावर्षी दर ताशी २० संख्येने उल्का दिसण्याची शक्यता आहे. मध्यरात्रीनंतर सिंह राशीत तारा समूहात उल्कावर्षांव पाहता येणार आहे. दरवर्षी १५ ते २५ नोव्हेंबरदरम्यान मोनोसेटाईड उल्कावर्षांव केनिस मायनर(कर्क राशीजवळ) या तारा समूहात दिसतो. मध्यरात्रीनंतर आपल्याला हा उल्कावर्षांव पाहता येईल. सर्वाधिक उल्का ह्य २२ नोव्हेंबरला दिसतात. ‘सी/१९१७-एफ वन’ ह्या धुमकेतूमुळे हा उल्कावर्षांव दिसतो. संपूर्ण नोव्हेंबर महिना हा उल्कावर्षांवाचा महिना आहे. तेव्हा खगोलप्रेमींनी अवश्य सर्वच उल्कावर्षांव पाहावे, असे आवाहन स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी केले आहे.