मिहानच्या डेपोत अद्ययावत स्वयंचलित यंत्रणा

मेट्रो रेल्वेच्या डब्यांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी मिहानमध्ये उभारण्यात येणाऱ्या केंद्रात डब्यांची स्वच्छता केवळ दोन ते तीन मिनिटात पूर्ण करणारी स्वयंचलित यंत्रणा बसविण्यात येणार आहे. मेट्रो मार्ग उभारणीच्या कामातील वेगाप्रमाणेच इतर कामांच्या गतीवर व्यवस्थापनाने लक्ष केंद्रित केले आहे.

नागपूर मेट्रो रेल्वे डब्यांच्या देखभाल दुरुस्ती केंद्राचे भूमिपूजन मंगळवारी मिहान परिसरात पार पडले. खापरी ते ऑटोमोटिव्ह चौक या मार्गावर धावणाऱ्या गाडय़ांची येथे देखभाल दुरुस्ती केली जाईल. अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज राहणाऱ्या या केंद्रात स्वयंचलित उपकरणाद्वारे एका गाडीच्या स्वच्छतेसाठी केवळ दोन ते तीन मिनिटाचा अवधी लागणार आहे.

डब्यांच्या आतील भागाची स्वच्छता करण्यासाठी या केंद्रात एक स्वतंत्र प्लॅन्टची उभारणी केली जाईल. देखभाल दुरुस्तीच्या इतरही कामांचा वेग अशाच पद्धतीचा असेल, त्यात रूळ दुरुस्ती असो वा सिग्नलिंगचाही समावेश आहे. मेट्रोच्या इतरही कार्यालयाप्रमाणे सौर ऊर्जानिर्मितीसाठी या केंद्राच्या छप्परावर आणि संरक्षक भिंतीवर सौर पॅनल असणार आहे.

नागपूर मेट्रोसाठी मार्ग उभारणीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. या कामाची गती पाहूनच शासनाने महाराष्ट्र पातळीवर मेट्रोचे काम करण्यासाठी नवीन कंपनी स्थापन करून त्याची सूत्रे नागपूर मेट्रो रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्याकडे दिली आहे. या कंपनीकडे पुणे मेट्रोचेही काम आहे. नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील चाचणी पुढील वर्षी डिसेंबर महिन्यात होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.

मेट्रोसाठी डबे तयार करण्याचे कंत्राट चीनच्या कंपनीला देण्यात आले असून ही कंपनी बुटीबोरी एमआयडीसीतच या डब्यांची निर्मिती करणार आहे. सर्वच कामात अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर केला जात असल्याने काम निर्धारित वेळेत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

 

दर तीन दिवसातून एकदा स्वच्छता

स्वयंचलित प्रकल्प मिहान आणि हिंगणा या दोन्ही डेपोमध्ये सुरू करण्यात येणार आहे. ६० बाय १० मीटर इतकी जागा त्याला लागणार असून जास्तीत जास्त तीन मिनिटात संपूर्ण गाडीची स्वच्छता पूर्ण केली जाईल. प्रवाशांना स्वच्छ आणि निटनेटक्या बोगीतून प्रवास करता यावा म्हणून दर तीन दिवसात एक वेळा ती स्वच्छ केली जाणार आहे.