विविध कामांची पाहणी

नागपुरातील महामेट्रोच्या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी या प्रकल्पाला अर्थपुरवठा करणाऱ्या के.एफ.डब्ल्यू. जर्मनी आणि ए.एफ.डी. फ्रान्सच्या तीन समित्या तीन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आल्या आहेत.

रविवारी या चमूने मेट्रोच्या मार्गाची तसेच स्थानकांची पाहणी केली. प्रकल्पाचे काम कसे सुरू आहे, याची पाहणी करण्यासाठी के.एफ.डब्ल्यू. आणि ए.एफ.डी.ने हा दौरा आयोजित केला आहे. ११ नोव्हेंबरला सोमवारी समिती सदस्यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांची भेट घेऊन त्यांच्याकडून प्रकल्पाच्या प्रगतीची माहिती घेतली.

चर्चेदरम्यान जर्मनी आणि फ्रांसच्या शिष्टमंडळाने महा मेट्रोद्वारे, राबवण्यात येत असलेल्या मल्टी मॉडल इंटिग्रेशन, ट्रांझिट-ओरिएंटेड डेव्हलपमेंट (टीओडी), कॉमन मोबिलीटी कार्ड, फर्स्ट अँड लास्ट माईल कनेक्टिव्हिटी, फिडर सव्‍‌र्हिस तसेच सोलर ऊर्जा प्रकल्पाचा आढावा घेत शिष्टमंडळाने मेट्रोच्या संपूर्ण कार्याची प्रशंसा केली. या शिष्टमंडळात के.एफ.डब्ल्यू. जर्मनीचे प्रकल्प व्यवस्थापक क्रिस्टीयन वोस्लर, तांत्रिक तज्ज्ञ पीटर रुनी, जुटा वोल्मर, सविता मोहन राम, वरिष्ठ क्षेत्र तज्ज्ञ स्वाती खन्ना तसेच ए.एफ.डी. फ्रांसचे भारतातील व्यवस्थापक ब्रुनो बोसल,  सिल्वेन बर्नाड-श्रीनिवासन, प्रकल्प व्यवस्थापक  रजनीश अहुजा यांचा समावेश होता. महामेट्रोच्यावतीने संचालक महेश कुमार, महेश सुनील माथुर, एस. शिवमाथन, रामनाथ सुब्रमण्यम, अनिल कोकाटे यावेळी उपस्थित होते.

रेल्वे कोच कारखाना राज्यासाठी वरदान ठरेल  – दीक्षित

नागपुरातील प्रस्तावित रेल्वे कोच कारखाना नागपूरच नव्हे तर विदर्भ व महाराष्ट्रासाठी वरदान ठरेल, अशी अपेक्षा महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी केली आहे.

उद्योग भवन सभागृहात आयोजित वेंडर विकास कार्यक्रमात ते बोलत होते. चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशन एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन (हिंगणा), जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. दीक्षित म्हणाले, महामेट्रोचा दुसरा टप्पा प्रस्तावित आहे. तसेच रेल्वे कोच कारखानाही सुरू करण्यात येणार आहे. त्याचा डीपीआर करण्याचे काम सध्या सुरू आहे. याशिवाय पुणे, नाशिक, ठाण्यातही विविध कामांच्या नवीन संधी आहे. मेट्रो रेल्वेत लहान-मोठे  सुटे भाग निर्माण करण्याच्या दिशेने पाऊल टाकल्यास औद्योगिकरणास गती मिळेल व रोजगार निर्मिती सुद्धा होईल. रेल्वे कोच कारखान्यामुळे नागपूरच नव्हे तर विदर्भ व महाराष्ट्रासाठी वरदान ठरेल, असा आशावाद दीक्षित यांनी व्यक्त केला. नागपूरमध्ये सुरू असलेल्या मेट्रोसारख्या मोठय़ा प्रकल्पांचा औद्योगिकदृष्टय़ा जितका लाभ व्यावसायिकांनी उठवायला हवा होता, तेवढा उचलला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.