नागपुरातील महामेट्रोला आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी तसेच जास्तीत जास्त प्रवासी मिळावे म्हणून भारतीय रेल्वेच्या मार्गावरून मेट्रो सोडण्याची घोषणा हे वास्तविकतेला धरून नसल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ही संकल्पना देखील त्यांच्या इतर संकल्पनांप्रमाणे सादरीकरणापुरती मर्यादित राहण्याची शक्यता आहे.

विदेशी कर्ज काढून १० हजारांहून अधिक कोटी रुपयांची गुंतवणूक नागपुरातील मेट्रो प्रकल्पात करण्यात आली आहे. एवढी प्रचंड गुंतवणूक आणि अन्य शहरातील मेट्रोचा अनुभव बघता मेट्रो कधीच नफ्यात तर सोडा ना नफा आणि तोटा या पातळीपर्यत धाव घेऊ शकत नाही हे सिद्ध झाले आहे. परंतु रस्त्यांवरील वाहनांची गर्दी टाळण्यासाठी हे प्रकल्प रेटले जात आहेत. महामेट्रोला थोडेफार तरी उत्पन्न मिळावे म्हणून मेट्रोसारखे दिसणाऱ्या  डब्यांची गाडी रेल्वेच्या मार्गावर सोडण्याची संकल्पा गडकरी यांनी मांडली आहे. गडकरी यांच्या उपस्थितीत अलिकडे त्याचे सादरीकरण मेट्रो आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमोर करण्यात आले. महामेट्रोतर्फे शहरानजिकच्या इतर शहराकरिता मेट्रो चालविण्यासंदर्भात हे सादरीकरण होते.

मेट्रो आणि रेल्वेमध्ये फरक आहे. मेट्रो केवळ महानगरात चालवण्यासाठी आहे. रेल्वे लांब अंतरासाठी तसेच ६० ते २०० किमी अंतरावरील शहरासाठी चालवली जाते. रेल्वेची शटल सेवा किंवा पॅसेंजर ट्रेन अशा कमी अंतराच्या शहरांसाठी आहे. मात्र त्याऐवजी मेट्रो चालवण्याचे प्रस्तावित आहे. याचे दूरगामी परिणाम भारतीय रेल्वेवर होणार आहे. रेल्वेच्या रुळांवरून धावू शकणारे डबे तयार करणे, गाडय़ांचे वेळापत्रक, देखभाल दुरुस्ती, तिकीट विक्री उत्पन्नाचा वाटा असे अनेक मुद्दे समोर आले आहे. याहून सर्वात महत्वाचे म्हणजे केवळ  नागपूरसाठीच रेल्वेला हा निर्णय घेता येणे शक्य नाही. रेल्वे बोर्डाला यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे. अशी मागणी इतरही महानगरातून आली तर संपूर्ण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडेल, असा दावा रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी करतात. मेट्रोगाडयांची गती ८० ते ९० किमी प्रती तास असते. राजधानी एक्सप्रेस १२० प्रती तास किमीच्या वेगाने धावत आहे.

मेट्रो आणि रेल्वेतील फरक

मेट्रोची संकल्पनाच मूळात महानगरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आहे. शहराच्या बाहेर धावण्यासाठी रेल्वे आहे. मेट्रोचे विशेष डिझाईन असते. ती महानगरात धावण्यासाठी असते. त्यासाठी स्वतंत्र मार्ग करावे लागते. रेल्वे लांब पल्ल्यासाठी तसेच जवळच्या शहरामध्ये पॅसेंजर गाडय़ा चालवण्यासाठी आहे. या मार्गावरून लांब पल्ल्याच्या तसेच कमी अंतराच्या प्रवासी गाडय़ा चालवण्यासाठी आणि मालगाडी चालवण्यासाठी देखील केला जातो.  मेट्रोचे ट्रॅक भुयारी किंवा जमिनीपासून उंचीवर असतात. रेल्वेचे रुळ सामान्यत जमिनीवरच असतात.

‘‘मेट्रोने स्थानिक अधिकाऱ्यांसमोर सादरीकरण दिले होते. पण यात स्थानिक अधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची नाही. रेल्वे मार्गावरून मेट्रो धावण्यासंदर्भातील निर्णय बोर्डाच्या पातळीवर होणार आहे. मेट्रोने कदाचित रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांना सादरीकरण दिले असावे. यामुळे प्रकरणात फार काही बोलणे योग्य नाही.’’

-अमितकुमार अग्रवाल, विभागीय व्यवस्थापक, दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे.