ब्रिजेश दीक्षित यांचा विश्वास

नागपूर मेट्रो रेल्वे ही शहरातील नागरिकांच्या जीवनशैलीत बदल घडवून आणेल, असा विश्वास महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केला. नागपूरकरांचे सहकार्य आणि कर्मचाऱ्यांच्या अहोरात्र मेहनतीमुळे देशात सर्वाधिक गतीने पूर्ण होणारा प्रकल्प म्हणून नागपूर मेट्रोकडे पाहिले जात आहे. सध्या कामामुळे नागरिकांना त्रास होत असला तरी भविष्यात यामुळे त्यांच्या जीवनशैलीत बदल घडेल, असे दीक्षित म्हणाले.

उन्नती फाऊंडेशन आणि छात्रजागृती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात दीक्षित बोलत होते. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. ‘महामेट्रो : काल, आज आणि उद्या’ या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्यासपीठावर खासदार अजय संचेती, आमदार गिरीश व्यास, वेदचे माजी अध्यक्ष विलास काळे, अतुल कोटेचा, नगरसेवक निशांत गाधी उपस्थित होते.

स्वातंत्र्यपूर्व काळात नागपूर महत्त्वाचे शहर होते. त्यामुळेच अनेक पायाभूत सुविधा येथे पूर्वीपासूनच उपलब्ध आहेत. मात्र, त्यात वाढ करण्याच्या दृष्टीने मेट्रोची उभारणी केली जात आहे. नागपूर मेट्रो ही देशातील पाचवी मेट्रो आहे. ३१ मे २०१५ मध्ये प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. २७ महिन्यात मेट्रोने चाचणीपर्यंतचा प्रवास पूर्ण केला. मेट्रो हा सार्वजनिक वाहतुकीसाठी सर्वात सुलभ पर्याय आहे. मेट्रोच्या दोन्ही टप्प्यात शहरातील औद्योगिक, रहिवासी, व्यावसायिक, शैक्षणिक संस्थांना विमानतळ रेल्वेस्थानक, बसस्थानक यांच्याशी जोडण्याचे काम होणार आहे. सध्या ३५ टक्के काम पूर्ण झाले असून मेट्रोविस्ताराचे कामही हाती घेण्यात येणार आहे. मेट्रोचा प्रवास स्वस्त, सुरक्षित यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहे, असे दीक्षित म्हणाले.

शहराच्या विकासासाठी मेट्रो महत्त्वाचा टप्पा ठरेल, असे खासदार संचेती म्हणाले. यावेळी विलास काळे यांचेही भाषण झाले.  प्रास्ताविक अतुल कोटेचा यांनी केले. संचालक निशांत गांधी यांनी केले.