नवीन इमारतीसाठी मेट्रो रेल्वेची परवानगी अनिवार्य

मेट्रो रेल्वेच्या खांबासाठी केलेल्या खोदकामामुळे ६६ फुटांच्या परिघात जमिनीत कंपने निर्माण होणार असल्याने या प्रभावक्षेत्रातील इमारतींना भविष्यकाळात धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ऑटोमोटिव्ह चौक ते मिहान आणि प्रजापतीनगर ते लोकमान्यनगर या दोन मार्गावर मेट्रो रेल्वे धावणार आहे. त्यासाठी मार्गाचे काम सुरू झाले आहे. रेल्वेच्या या दोन्ही कॉरिडॉरवर अनेक इमारती आहेत. सेंट्रल अ‍ॅव्हेन्यूवरील ३० ते ५५ वर्षे जुन्या असलेल्या अनेक इमारती मेट्रोच्या प्रभावक्षेत्रात येणार आहेत. रेल्वेमार्गासाठी उभारण्यात आलेल्या स्तंभापासून ६६ फुटांपर्यंत मेट्रोचे प्रभावक्षेत्र आहे. यात कंपने निर्माण होऊन परिसराला हादरे बसून इमारतींचा पाया कमकुवत होऊ शकतो.

शहरात बांधकाम करणाऱ्यांसाठी महापालिका, नगररचना आणि नागपूर सुधार प्रन्यास यांच्याकडून परवानगी घ्यावी लागते. मेट्रो कॉरिडॉरच्या २० मीटरच्या प्रभावक्षेत्रात नवीन इमारत बांधकाम करावयाचे असल्यास यापुढे मेट्रो रेल्वेकडून ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र घ्यावे लागेल. नगर विकास खात्याने ९ जून २०१७ ला याबाबत अधिसूचना काढली असून कंपने सहन करण्याची क्षमता असलेला मजबूत पाया उभारण्यात आल्यावरच मेट्रोकडून ‘स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट’ दिले जाणार आहे. मात्र, अनेक वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतींचे काय, हा प्रश्न कायम आहे. यामुळे सेंट्रल अ‍ॅव्हेन्यूवरील व्यापाऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.

अंबाझरी तलावाचे काय?

रेल्वेचा पूर्व-पश्चिम मार्ग अंबाझरी तलावाजवळून जातो. १४६ वर्षे जुना हा तलाव असून त्याचा बांध मातीचा आहे. तलावाच्या बांधापासून अगदी काही अंतरावर मेट्रो रेल्वेमार्ग आहे. मेट्रोचे प्रभावक्षेत्र २० मीटर आहे. या परिस्थितीत अंबाझरी तलावाचे काय होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या तलावाशेजारी विवेकानंद स्मारक उभारण्यात आल्याने देखील तलावाला धोका असल्याचे धरण सुरक्षितता संघटनेने (डीएसओ) निदर्शनास आणून दिले आहे.

मेट्रो रिजन एक  अन् मेट्रो रेल्वेला दुसरा न्याय -पवार

मेट्रो रिजनमध्ये जलस्रोतापासून १०० मीटपर्यंत बांधकाम करण्यास मनाई आहे, परंतु येथे १० ते १५ फुटावर मेट्रो रेल्वेच्या मार्गासाठी खांब उभारण्यात आले आहेत. हा कुठला न्याय?  जलस्रोतापेक्षा मेट्रो अधिक महत्त्वाची आहे काय, दुसरीकडे सीएवरील जुन्या इमारतींना धोका पोहोचल्यास जबाबदार कोण, तेथील लोकांनी जायचे कुठे, ६६ फुटांपर्यंत कंपने निर्माण होणार असतील तर मेट्रोचे काम करण्यापूर्वी तेथील लोकांची परवानगी घेतली का? आदी सवाल ‘जय जवान जय किसान’ संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी केला.