एमआयडीसी पोलिसांकडून हनी ट्रॅपमधील तिघांना अटक

नागपूर : लोकांना शरीरसुखाचे आमिष दाखवून त्यांना लुटणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले. पोलिसांनी तिघांना अटक केली असून एक महिला आरोपी अद्याप फरार आहे.

सुमित ऊर्फ दद्दू व्यंकटराव परिहार (२१), गुन्नू बाटेश्वर मंडल (२२),  आणि तुषार ऊर्फ मोनू ऊर्फ तोतल्या अशोक जगताप (१९) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. रिया ऊर्फ पल्लवी ऊर्फ प्रिया ऊर्फ श्वेता रहांगडाले (२५) आणि रजत ठाकूर हे दोघे फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. फिर्यादी  हा एका खासगी कंपनीत विपणन व्यवस्थापक आहे. आरोपींनी संगनमत करून रिया ऊर्फ पल्लवी हिला फिर्यादीशी मैत्री करायला लावले. त्यानंतर त्याला शरीरसुखाचे आमिष दाखवले. त्याकरिता त्याला २१ ऑगस्टला दुपारी १.३० वाजता हिंगणा मार्गावरील राजगृहनगर येथे बोलावून घेतले. त्यानंतर रिया त्यांना आपल्यासोबत घेऊन गेली. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ रिया व फिर्यादी कारमध्ये बसून असताना आरोपी तेथे पोहोचले. चाकूच्या धाकावर आरोपींनी त्याला धमकावले व त्याच्याकडून तीन हजार रुपये रोख, एटीएममधून ९० हजार रुपये असे एकूण ९३ हजार रुपये हिसकावले. शिवाय बदनामीतून वाचण्यासाठी किंवा घरापासून माहिती लपवून ठेवण्यासाठी आरोपींनी त्यांच्याकडे ८ लाख रुपयांची मागणी केली. त्यांच्या तावडीतून सुटल्यानंतर फिर्यादीने दुसऱ्या दिवशी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निरीक्षक रमेश हत्तीगोटे, उपनिरीक्षक विजय नेमाडे, अरविंद मोहोड, विनायक मुंढे, आशीष दुबे आणि प्रिया हिरवाणी यांनी तपास करून आरोपींना पकडले, अशी  माहिती खराबे यांनी लोकसत्ताला  दिली.