कोलाहलामुळे खासगी आयुष्यावर अतिक्रमण;  वकीलपेठ, एमआयजी कॉलनीतील लोक त्रस्त

मंगल कार्यालये, विविध समाजिक संस्थांची सभागृहे, लॉन्स ही विविध कार्यक्रमांकरिता समाजाची गरज झाली असली तरी त्याचे बांधकाम, तेथील सुविधा, वाहनतळासाठी पुरेशी जागा आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून केलेली उपाययोजना महत्त्वाची ठरते. मात्र, या संदर्भातील सर्व नियमांना पायदळी तुडवत केवळ व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून अलीकडच्या काळात या कार्यालयांचे आणि सभागृहाचे संचालन केले जाते. नागरी वस्तीत, दवाखान्याजवळ आणि चक्क रस्त्यावर कार्यालये थाटून आणि तेथे येणाऱ्यांसाठी वाहनतळासह कुठल्याही सुविधा उपलब्ध न करता मंगल कार्यालयांनी बाजार थाटला आहे. त्याचा सर्वसामान्यांना होत असलेला त्रास असह्य़च नव्हे तर मनस्ताप करणारा ठरला आहे. लोकसत्ताच्या चमूने याचा वृत्तमालिकेच्या माध्यमातून घेतलेला हा आढावा.

नागपूरच्या प्रत्येक मोठय़ा रस्त्यांवर आणि चौकात असलेल्या मंगलकार्यालयांनी आजूबाजूच्या नागरिकांचे जीवन असह्य़ करून सोडले असून वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करून होणाऱ्या त्रासांची जंत्री मांडली आहे तसेच यामुळे होणाऱ्या त्रासावर अभ्यास करून न्यायालयात प्रकरणे सादर केली आहेत.

प्रत्येकाला कधी ना कधी तरी व कुठल्या ना कुठल्या मंगल कार्यालयात जाण्याचा प्रसंग येतो. तेथील आतील आणि बाहेरचे असे परिस्थितीसापेक्ष अनुभव वेगळे असतात. आत असताना स्वत:चे किंवा आप्ताचे लग्न असताना अनुभव वाईट असण्याचे कारण नाही. पण मंगलकार्यालयाच्या बाहेरच्या नागरिकांना येणाऱ्या अनुभवांनी आपल्यालाही हवालदिल व्हायला होते. कार्यालयाच्या बाहेर मौज म्हणून उडवले जाणारे फटाके, बँडबाज्यामुळे आजूबाजूच्या लोकांच्या खासगी आयुष्यावर अतिक्रमण केले जाते. महात्मा फुले सांस्कृतिक भवन, जैन कलार समाज सभागृह आणि नगर आखाडा याठिकाणी असलेल्या मंगल कार्यालयांमुळे वकीलपेठ, एमआयजी कॉलनीतील लोक पुरते वैतागले आहेत. दुभाजकावर फटाक्यांच्या माळा फोडण्याच्या आणि बँड पथकाच्या आवाजामुळे एमआयजी कॉलनीतील काही लोकांनी घरे विकून दुसरीकडे विकत घेतली तर काही विकायच्या मार्गावर आहेत.

सभागृहाच्या बाजूला प्रेरणा कॉन्व्हेंट, आयुर्वेद महाविद्यालय, महात्मा फुले मुलींचे वसतिगृह आणि इतरही इमारती आहेत तर उमरेड मार्गावर गिल्लूरकर रुग्णालयाच्या रांगेत इतरही रुग्णालये आहेत. शाळा किंवा रुग्णालयांच्या परिसरात आवाजावर निर्बंध आहेत.

तो मोडला की पोलीस कारवाई सुद्धा करतात. मात्र, याठिकाणी तर सकाळ ते संध्याकाळ कर्णकर्कश्य आवाज असतो. पुढे क्रीडा चौकात नॅशनल बी.पी. सोशलवर्क कॉलेजच्या आधी अलीकडेच न्यू हराईझोन आणि त्याच्या विरुद्ध प्रगती सभागृह आहे. त्याठिकाणी वाहनतळाची मोठी समस्या आहे.

त्यानंतर पुढे तुकडोजी चौकातून मानेवाडा चौकाकडे जाताना रस्त्याच्या उजव्याबाजूला सभागृहांची रांगच आहे. जीवतोडे बंधू सभागृह, मार्कण्डेय मंदिर सभागृह, सुरज भवन, सिद्धेश्वर सभागृह आणि लॉन देखील. तर रस्त्याच्या डाव्याबाजूला खानझोडेनगरात गोंडवाना विकास मंडळाचे सभागृह भर वस्तीत आहे तर पुढे गेल्यावर मानेवाडा चौकाजवळ बाकडे सभागृह आहे. मानेवाडा मार्गावरील कोणत्याही सभागृहाला स्वत:चे वाहनतळ नाही. रस्त्यावरच गाडय़ा उभ्या केल्याने आजूबाजूच्या दुकानांना, शाळांना त्याचा त्रास होतो. मार्कण्डेय सभागृह आणि चरिष्मा इंग्रजी कॉन्व्हेंटची एकच भिंत आहे. शाळेच्या पुढे वाहने लागू नये एक माणूस देखरेखीसाठी ठेवावा लागतो.

उष्टय़ा पत्रावळींने दरुगंधी

न्यू हराईझोन आणि त्याच्या विरुद्ध प्रगती सभागृह आहे. तेथील समारंभाचा आजूबाजूच्या घरांना त्रास होतो. उष्टय़ा पत्रावळी बाहेर रस्त्यावर, सोसायटीच्या बाजूला एक उकांडा करून फेकल्या जातात. त्याची दरुगधी सतत त्या परिसरात असते.

दुभाजकावर फटाक्याच्या माळा आणि बँडबाजामुळे अक्षरश: आम्ही हैराण आहोत. एकदोन दिवसाचा त्रास नाही, संपूर्ण हंगामात अशीच स्थिती असते. हल्ली चिनी फटाके वाजवले जात असल्याने त्याच्या धुरामुळे घशांचे आजार आणि हृदयरोग असणाऱ्यांना दवाखान्यात जाण्याची तयारी करावी लागते. पोलिसांना फोन केल्यानंतर ते दोन तासाने येतात. तोपर्यंत फटाके फोडून झालेले असतात आणि बँड बाजवणारेही गेलेले असतात. पोलीस येतात कार्यालयात जाऊन चिरीमिरी घेतात आणि वरिष्ठांना घटनास्थळी काहीच नव्हते. खोटी तक्रार असल्याचे सांगतात. सभागृहाचे व्यवस्थापक ‘तुमच्यासाठी आमचा धंदा बंद करावा का? काय करायचे ते करा’ असे म्हणतात.

– शाम देऊळकर, सचिव, एमआयजी सोसायटी.