श्रमिक गाडय़ांचा वळसा; मजुरांच्या हालात भर

राजेश्वर ठाकरे

टाळेबंदीमुळे रस्तेप्रवासावर निर्बंध असताना हळूहळू सुरू करण्यात आलेला रेल्वे आणि हवाई प्रवासही खडतरच ठरत आहे. टाळेबंदीत सर्वाधिक भरडलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी श्रमिक विशेष रेल्वे गाडय़ा सुरू करण्यात आल्या. मात्र, अनेक गाडय़ा थेट मार्गाने न नेता शेकडो किलोमीटरचा वळसा घालून नेण्यात येत असल्याने मजुरांचा प्रवास लांबला असून, त्यांच्या हालात भर पडत आहे. दुसरीकडे, सोमवारपासून देशांतर्गत विमानप्रवास सुरू करण्यात आला. मात्र, रद्द झालेली विमाने, अनेक राज्यांनी घातलेल्या विविध अटींमुळे विमान प्रवाशांसाठी पहिला दिवस गोंधळाचा ठरला.

टाळेबंदीमुळे हातचे काम गेले, खायला अन्न नाही, अशा बिकट परिस्थितीचा सामना करणाऱ्या स्थलांतरित कामगारांचे रेल्वे प्रवासातही हाल होत आहेत. श्रमिक विशेष गाडय़ा थेट मार्गाने न नेता गेल्या काही दिवसांपासून तब्बल ११६ गाडय़ा नागपूरमार्गे वळण्यात आल्या. प्रवास लांबल्याने श्रमिकांच्या हालात भर पडली.

टाळेबंदीमुळे विविध राज्यांत अडकलेल्या हजारो स्थलांतरित कामगार, पर्यटक, विद्यार्थी यांना त्यांच्या गावी परतण्यासाठी श्रमिक विशेष रेल्वे गाडय़ा सोडण्यात येत आहेत. देशभरात एकाच वेळेस शेकडो श्रमिक विशेष रेल्वे गाडय़ा धावत आहेत. राजधानी दर्जाची विशेष गाडी, पार्सल ट्रेन, मालगाडय़ाही सुरू आहेत. टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्याच्या अखेरीस स्थलांतरित कामगारांसाठी अचानक गाडय़ांची संख्या वाढवण्यात आली. त्यामुळे रेल्वेचे नियोजन बिघडले. एकाच रेल्वे मार्गावरून राजधानी विशेष गाडी, श्रमिक विशेष गाडी, पार्सल गाडी, मालगाडी आल्याने ठिकठिकाणी रेल्वेची वाहतूक कोंडी झाली. ही कोंडी फोडण्यासाठी श्रमिक विशेष गाडय़ांचे मार्ग बदलण्यात आले. स्थलांतरित कामगारांना वळसा घेऊन त्यांच्या गावी पोहोचवण्यात येत आहे. त्यामुळे जेथे २८ तास लागतात, त्यासाठी त्यांना ७२ तास प्रवास करावा लागत आहे. या कामगारांना थांबा असलेल्या सर्वच स्थानकांवर पिण्याचे पाणी, खाद्यपदार्थ मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे कामगारांना अन्न, पाण्याविना शेकडो मैल प्रवास करण्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसते.

गेल्या पाच दिवसांत नागपूरमार्गे २०२ श्रमिक विशेष गाडय़ा धावल्या तर गेल्या तीन दिवसांत ११६ रेल्वे गाडय़ा नागपूरमार्गे वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्थलांतरित कामगारांना गावी पोहोचण्यासाठी तीन-चार दिवस प्रवास करावा लागत आहे. मजुरांना घेऊन गोव्यावरून उत्तर प्रदेशमधील बलियाकडे निघालेली गाडी नागपूरला पोहोचली. त्यामुळे जो प्रवास २८ तासांत पूर्ण होणे अपेक्षित होते, त्यासाठी तब्बल ७२ तास लागले. ही गाडी गुरुवारी गोव्यामधून उत्तर प्रदेशमधील बलियाच्या दिशेने निघाली होती.

३ दिवसांत ११६ रेल्वे

उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशाकडे जाणाऱ्या श्रमिक विशेष रेल्वे गाडय़ा २२ मे रोजी ३३, २३ मे रोजी ४५ आणि २४ मे रोजी ३८ नागपूरमार्गे वळण्यात आल्या आहेत.

२८ तासांच्या प्रवासाकरिता ७२ तास

श्रमिक विशेष गाडय़ांचे मार्ग बदलण्यात येत असल्याने आणि इतर गाडय़ांना मार्ग मोकळा करून देण्यासाठी ‘आऊटर’वर तासन्तास थांबवून ठेवण्यात येत असल्याने २८ तासांच्या प्रवासासाठी तब्बल ७२ तास लागत आहेत.

पुणे रेल्वे स्थानकावर पुन्हा परप्रांतीयांची गर्दी

पुणे : टाळेबंदीमुळे पुण्यात अडकलेल्या परप्रांतीयांनी सोमवारी पुन्हा पुणे रेल्वे स्थानकावर गर्दी केली. मात्र, प्रशासनाच्या यादीत नाव नसलेल्या नागरिकांना पोलीस यंत्रणेकडून परत पाठवण्यात आले. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. या नागरिकांना मूळ गावी परत जायचे असल्यास शहरात पोलीस उपआयुक्त व ग्रामीण भागात तहसीलदार यांच्याकडे नावनोंदणी करायची आहे. त्यानुसार अर्ज केलेल्यांची यादी तयार करून संबंधितांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात येते. अडकलेल्यांना पाठवण्याआधी संबंधित राज्याची पूर्वपरवानगी घेण्याची अट काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे अनेकजण अर्ज न करता बस किंवा रेल्वे स्थानकांवर गर्दी करत आहेत. प्रशासनाकडे अर्ज न केलेल्यांना परत पाठवण्यात आले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी दिली.

भोपाळसमोर वाहतूक कोंडी झाल्याने नागपूरमार्गे श्रमिक विशेष रेल्वे गाडय़ा वळण्यात आल्या. प्रवाशांना नागपूर स्थानकावर पिण्याचे पाणी आणि खाद्यपदार्थ देण्यात आले.

– एस.जी. राव, सहायक वाणिज्य व्यवस्थापक