पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्य़ांची स्थिती; सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्य़ातील

नागपूर : पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्य़ांत लसीकरण झालेल्या एकूण आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी १५९ कर्मचाऱ्यांमध्ये सौम्य प्रकारची लक्षणे आढळली असून दोघांना जास्त त्रास असल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात सर्वाधिक व्यक्ती नागपूर जिल्ह्य़ातील होते. दाखल केलेल्यापैकी एकाला काही वेळातच बरे वाटल्यावर रुग्णालयातून सुट्टी दिली गेली. हा प्रकार गंभीर नसून कोणतीही लस घेतल्यावर काहींना चक्कर, मळमळ ही सौम्य लक्षणे दिसणे शक्य असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

आरोग्य विभागाच्या पूणे कार्यालयातील नोंदीनुसार, पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा या सहा जिल्ह्य़ातील ३४ केंद्रांवर शनिवारी ३ हजार ४०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे लक्ष निश्चित केले होते. त्यातील २ हजार १४९ कर्मचाऱ्यांनी लस घेतली. हे प्रमाण ६३.२१ टक्के होते. या लस घेतलेल्यांना काही तासानंतर केंद्र सरकारच्या सूचनेनुसार संबंधित केंद्रातून भ्रमणध्वनीवर संपर्क साधून प्रकृतीची विचारणा केली गेली. त्यात नागपूर जिल्ह्य़ातील ग्रामीणच्या १०६, शहरातील ६ जणांमध्ये सौम्य त्रास, लक्षणे दिसले. त्यात ताप, लस दिलेला हात दुखणे, ताप, मळमळ, डोकेदुखी, भोवळ असे एखादे लक्षण अथवा त्याहून जास्त त्रास होता.

एका हिंगणा केंद्रात लस घेतलेल्या डॉक्टरला रुग्णालयात दाखल करावे लागले. हा डॉक्टर शालिनीताई मेघे रुग्णालयात सहयोगी प्राध्यापक आहे. त्याला चक्करसह इतर त्रास असल्याने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. तर गोंदियातही एकाला उलटीसह इतर त्रासामुळे तेथील रुग्णालयात दाखल केले गेले. परंतु काही तासात त्याला बरे वाटायला लागताच रुग्णालयातून सुट्टी दिली गेली. तर गोंदियात इतर ११ आरोग्य कर्मचाऱ्यांना सौम्य त्रास झाला. भंडारात २, गडचिरोलीत २९, वर्धा जिल्ह्य़ात ४ आरोग्य कर्मचाऱ्यांत सौम्य लक्षणे दिसली. सौम्य लक्षणे असलेल्या व्यक्ती घरीच होती. त्यांना काही तासांनी बरेही वाटायला लागले. या वृत्ताला आरोग्य विभागाच्या प्रत्येक जिल्ह्य़ातील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसह जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला आहे.

करोनाच नव्हे कोणत्याही इतरही लसीने काही लोकांना डोकेदुखी, भोवळ, मळमळ, तापासह इतरही काही सौम्य लक्षणे होऊ शकतात. परंतु हे व्यक्ती आपोआप बरे होतात. त्यामुळे करोनाची लस घेतल्यावरही काही सौम्य लक्षणे आल्यावर घाबरण्याची गरज नसून प्रत्येकाने ही लस घेणे फायद्याचे आहे. या लसीच्या सर्व आवश्यक चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी बिनधास्त लसी घ्याव्या.’’

– डॉ. उदय बोधनकर, बालरोग तज्ज्ञ, नागपूर.