राज्यात भीषण दुष्काळ असून शेतकऱ्यांना अनेकअडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांना दिलासा देण्याऐवजी मंत्री दुष्काळी पर्यटनात मग्न असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला.

दुष्काळाच्या पाहणीसाठी विदर्भात आलेले शेट्टी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राातील काही भागांत दुष्काळ तीव्र आहे. त्याकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. कुठे चारा छावणींना अनुदान नाही तर कुठे जनावरांसाठी चारा, पाणी उपलब्ध नाही. लोकसभा विजयाच्या धुंदीत राज्यकर्त्यांना दुष्काळग्रस्तांकडे बघण्यासाठी वेळ नाही. दुष्काळी मदतीसाठीचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. या दबावाला शेतकरी संघटना बळी पडणार नाही. शेतकऱ्यांसाठी  आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. सध्या मान्सूनपूर्व पाऊस ३० टक्केच पडला असून मान्सून अंदाजाबाबत हवामान खातेही अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांना योग्य एफआरपी न मिळण्यास कारखान्यासह राज्य व केंद्र सरकारही जबाबदार असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.

मतपत्रिकेवर निवडणूक घ्या

लोकसभा निवडणुकीत मतदान यंत्रांबाबत संशयास्पद गोष्टी पुढे आल्या. विशिष्ट वेळेनंतर सत्ताधारी उमेदवार मोठय़ा फरकाने आघाडीवर गेले. माझ्या मतमोजणीवेळी वायफायच्या सुविधा दिसत होत्या. आक्षेप घेताच त्या अदृश्य झाल्या. देशातील २५० मतदान केंद्रांत झालेले व मोजलेल्या मतदान संख्येत तफावत असून आक्षेप घेताच निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून माहिती काढली गेली. यामुळे पुढील निवडणूक आयोगाने मतपत्रिकेवर घ्यावी अशी मागणी त्यांनी केली.

विधानसभा निवडणूक स्वत: न लढण्याचे संकेत देत त्यांनी वंचित बहुजन आघाडीसह सर्वाना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.