X

नातेवाईकाच्या अत्याचारातून अल्पवयीन मुलीवर मातृत्व

मामा सतत अत्याचार केल्याने १४ वर्षीय मुलगी गर्भवती राहिली आणि तिने बाळाला जन्म दिला.

पोलिसांनी नोंदविला बलात्काराचा गुन्हा

आत्याच्या नवऱ्याने (मामा) सतत अत्याचार केल्याने एका १४ वर्षीय मुलगी गर्भवती राहिली आणि तिने आता बाळाला जन्म दिला. या प्रकरणात पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून नराधम मामाला अटक केली आहे. विजय रज्जू नहारकर (३१) रा. कामगार कॉलनी, सुभाषनगर असे आरोपीचे नाव आहे.

पीडित मुलगी ४ वर्षांची असताना तिच्या आईचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या वडिलांनी दुसरा विवाह केल्याने ती आपल्या आजी-आजोबाकडे राहू लागली.

मात्र, तिचे आजी- आजोबा तिच्या वडिलांकडे न राहता तिच्या आत्याच्या घरी राहात होते. या दरम्यान आत्याचा नवरा मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करीत होता. ऑगस्ट महिन्यात आजीचे निधन झाल्यावर तिचे वडील तिला घेऊन गेले. त्यानंतर तिची प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल केले.

त्यावेळी ती आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे लक्षात आले. दरम्यान, बदनामीच्या भीतीने तिच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली नाही. शेवटी २० सप्टेंबरला तिने एका मुलाला जन्म दिला.

त्यानंतर नातेवाईकांनी नावं ठेवण्यास सुरुवात केल्यानंतर मुलीच्या वडिलांनी तिला घेऊन राणाप्रतापनगर पोलीस ठाणे गाठले व तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी पीडित मुलीच्या तक्रारीनंतर बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

First Published on: October 4, 2017 1:47 am
  • Tags: minor-girl-rape,
  • वाचा / प्रतिक्रिया द्या
    Outbrain