नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षीय विद्यर्थिनीवर वारंवार अत्याचार केल्याने ती गर्भवती झाली. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी तिघांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केली.

राहुल देवराव बोंद्रे (३०) याच्याविरुद्ध अत्याचाराचा तर त्याचा भाऊ  अनमोल व आई अनिता बोंद्रे सर्व रा. भोलेबाबानगर या दोघांविरुद्ध शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी राहुल याला अटक केली आहे. तो फर्निचरचे काम करतो.

२०१६ मध्ये पीडित विद्यार्थिनीवर आरोपीने अत्याचार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास पीडितेच्या भावाला ठार मारण्याची धमकी दिली. यानंतरही राहुल याने  लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. दोघांच्या संबंधाबाबत नातेवाईकाला कळले. राहुलचा भाऊ  व आईने पीडित मुलीच्या नातेवाईकांची भेट घेतली. मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर दोघांचे लग्न करण्याचे आश्वासन पीडित मुलीच्या नातेवाईकांना दिले.

दरम्यान, मुलगी गर्भवती राहिली. राहुल याचा अन्य एका तरुणीसोबत साक्षगंध झाल्याची माहिती पीडित मुलगी व तिच्या नातेवाईकांना मिळाली. पीडित मुलीसह तिचे नातेवाईक राहुल याच्या घरी गेले. यावेळी राहुल याचा भाऊ  व आईने पीडित मुलगी व तिच्या नातेवाईकांना शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली.

मुलीने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी राहुल याच्याविरुद्ध अत्याचाराचा तर त्याचा भाऊ  व आईविरुद्ध शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला.