पोटविकार तज्ज्ञ प्रा. डॉ. सुधीर गुप्ता यांची माहिती; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

आई-वडिलांच्या दुर्लक्षामुळे लहान मुले खेळता-खेळता नाणे, खिळा, सेफ्टी पिन गिळण्याच्या घटना वाढल्या आहेत. काही अज्ञानी व्यक्तींकडून या मुलांना केळी खाऊ घातली जाते. त्याचा काहीही फायदा होत नाही. मुलाला वेळीच तज्ज्ञाकडे नेऊन ही वस्तू शरीराबाहेर काढायला हवी, असे मत सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील पोटविकार विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुधीर गुप्ता यांनी व्यक्त केले. लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान ते बोलत होते.

डॉ. गुप्ता म्हणाले, विदर्भ, छत्तीसगडसह मध्यप्रदेशात शासकीय रुग्णालयांत पोटविकार तज्ज्ञांची संख्या कमी आहे. सोबत येथे एन्डोस्कोपीसह इतर महागडय़ा यंत्राचीही कमी आहे. त्यामुळे मुलाच्या पोटातून या वस्तू काढण्याचे तंत्र तेथे नाही. तेथून अशा रुग्णाला इतर रुग्णालयात पाठवले जाते. दरम्यान, मुलांना रुग्णालयात आणण्यापूर्वी काही अज्ञानी लोकांकडून मुलांना केळीसह विविध पदार्थ खाऊ घातले जातात. त्यामुळे बऱ्याचदा गिळलेली नाणी वा टोकदार वस्तू आतडीत रूतून तेथे रक्तस्रावासह इतरही गंभीर धोके संभवतात. श्रीमंत घरातील व्यक्ती खासगी रुग्णालयांत उपचार घेऊ शकतात, परंतु गरीब रुग्णाला सुपरस्पेशालिटी या शासकीय रुग्णालयाचाच आसरा आहे. येथे मुलाच्या विविध तपासण्या करून नाण्यासह इतर वस्तू पोटाच्या आतडीत कुठे आहे, हे बघून उपचाराची दिशा निश्चित केली जाते. त्यानंतर एन्डोस्कोपी अथवा शल्यक्रियेतून ही वस्तू बाहेर काढली जाते, असेही डॉ. गुप्ता यांनी सांगितले.\

पावसाळ्यात मुलांमध्ये आजार वाढतात

नागपूरसह विदर्भात गेल्या काही दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात सतत पडणाऱ्या पावसामुळे मुलांपासून सर्वच वयोगटातील व्यक्तींमध्ये अतिसार, ताप, काविळचे आजार वाढले आहेत. दूषित पाणी, बाहेरचे अन्नपदार्थ खाण्यासह खानपानाच्या वाईट सवयींमुळे हा आजार वाढल्याचे निरीक्षण सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील तज्ज्ञांकडून नोंदवले जात आहे. मुलांमधील हा आजार टाळण्यासाठी प्रत्येक पालकांनी शक्यतो मुलांना पाणी उकडूनच प्यायला द्यावे, बाहेरचे काहीही खायला देऊ नये, वेळोवेळी साबणाने हात धुवायला लावावे, मुले खेळत असलेली जागा स्वच्छ ठेवावी, घराच्या शेजारी डास होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. मुलाची प्रकृती खालवताच तातडीने जवळच्या शासकीय व खासगी डॉक्टरांकडून उपचार घ्यावा, अशी माहिती डॉ. गुप्ता यांनी दिली.

पाच वर्षांत ४५ मुलांच्या पोटातून वस्तू काढल्या

सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील पोटविकार विभागात गेल्या पाच वर्षांमध्ये सुमारे ४५ लहान मुलांच्या पोटातून एन्डोस्कोपीसह इतर पद्धतीने नाणे, सेफ्टी पिन, प्लास्टिकचा तुकडा, खिळे, सूई, बटनसह इतरही वस्तू काढण्यात आल्या आहेत. या प्रकारासाठी येथे उपचाराला येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सर्वात कमी दोन वर्षांच्या मुलीच्या पोटातूनही वस्तू काढल्याची माहिती त्यांनी दिली.