देवेश गोंडाणे

आरोग्य विभागातील भरतीसाठी रविवारी झालेल्या परीक्षेचे नियोजन करणाऱ्या खासगी कंपन्यांचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे. राज्यातील परीक्षा केंद्रांवर नियोजनाअभावी मोठा गोंधळ उडाला, तर नागपुरातील काही केंद्रांवर प्रश्नपत्रिका फुटल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला.

या गोंधळामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. विशेष म्हणजे खासगी कंपनीमार्फत परीक्षा घेतल्याने हा गोंधळ झाल्याचा ठपका ठेवत परीक्षार्थी आणि काही संघटनांनी परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना पत्रही देण्यात येणार आहे.

आरोग्य विभागात साडेआठ हजार पदांसाठी रविवारी राज्यातील जिल्हा आणि तालुका केंद्रांवर दोन सत्रांत ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली. ‘एमपीएससी’मार्फत परीक्षा घेण्याची मागणी फेटाळून राज्य शासनाच्या ‘महाआयटी’ने नेमलेल्या खासगी कंपन्यांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली; परंतु परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार घडल्याने आरोग्य विभागाच्या पारदर्शकतेविषयी प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नागपूर केंद्रावर करण्यात आलेली प्रश्नपत्रिका फुटीची तक्रार, अनेक उमेदवारांना परीक्षेच्या वेळेपर्यंत परीक्षा खोलीत प्रवेश न मिळणे, अनेक केंद्रांवर बैठक व्यवस्थेअभावी नियम धाब्यावर बसवून एकाच बाकावर दोन ते तीन उमेदवारांना बसवणे अशा अनेक तक्रारींमुळे आरोग्य विभागाच्या परीक्षेत ‘मास कॉपी’, तोतया उमेदवारांना बसवणे असे गैरप्रकार झाल्याचा आरोपही होत आहे. अनेक केंद्रांतील बाकांवर उमेदवारांचे बैठक क्रमांकच नसल्याचे आढळले. एका केंद्रावर चक्क जमिनीवर बसवून परीक्षा घेण्यात आल्याने परीक्षा नियोजन करणारे राज्य सरकार आणि खासगी कंपनीविरोधात विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.

चार वर्षांपासून परीक्षेची कसून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणे बंद करावे, शिवाय ही परीक्षाच रद्द करावी, अशी मागणी आता करण्यात आली आहे.

झाले काय?

* अहमदनगर येथील परीक्षा खोलीत एका बाकावर किमान आठ ते दहा परीक्षार्थी एकत्रित पेपर सोडवत असल्याचे समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या छायाचित्रात दिसत आहे. पाठीमागच्या बाकावरही तशीच बैठक व्यवस्था असल्याचे छायाचित्रात दिसते.

* अनेक केंद्रांवर बैठक क्रमांक नसल्याने कोणी कुठेही बसा असा प्रकार होता, तर दापोली येथील परीक्षा केंद्रावर उमेदवार सकाळी १० वाजता पोहोचले. मात्र, केंद्रच बंद होते.

* परीक्षेच्या वेळेपर्यंत केंद्रच उघडले नसल्याच्या तक्रारी राज्यातील अनेक केंद्रांवरून आल्या आहेत. सरळसेवा भरती असतानाही केंद्रांवर पोलीस संरक्षणही नव्हते, तर नाशिक येथील परीक्षा केंद्राबाहेर एक तास ताटकळत उभे राहावे लागल्याने उशिरा परीक्षा सुरू झाली.

* औरंगाबादमधील काहीकेंद्रांवर प्रश्नपत्रिका उशिरा पोहोचल्याचा आरोप आहे, तर काही केंद्रांवर गैरप्रकार झाल्याने उमेदवारांनी गोंधळ घातला. पोलिसांना पाचारण करावे लागले.

परीक्षार्थीचे हाल..

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रविवारी राज्यातील अनेक जिल्ह्य़ांमध्ये टाळेबंदी होती. त्यामुळे बाहेरून आलेल्या उमेदवारांचे हाल झाले. नागपूरमध्ये खानावळींपासून सारेच काही बंद असल्याने उमेदवारांची उपासमार झाली. पाचते ते सातशे किमीचा प्रवास करून आलेले अनेक उमेदवार परीक्षा केंद्रांच्या बाहेर सकाळी मिळेल तेथे अंग टाकलेल्या अवस्थेत दिसत होते.