13 November 2019

News Flash

‘फ्रेन्ड्स’च्या मालकाला वाचवण्यासाठी पोलिसांकडून दिशाभूल

महिला सुरक्षेपेक्षा हितसंबंध जोपासण्याला प्राधान्य

(संग्रहित छायाचित्र)

मंगेश राऊत

‘फ्रेन्ड्स’च्या मालकाला वाचवण्यासाठी सीताबर्डी पोलिसांकडून खटाटोप सुरू असून कपडे बदलण्याच्या खोलीत कॅमेरा बसवण्यासाठी नोकरच कसा जबाबदार आहे व मालकाची काहीच भूमिका कशी नाही, हे पटवून देण्यासाठी वरिष्ठांची दिशाभूल करण्यात येत आहे. सीताबर्डी पोलिसांच्या भूमिकेवरून पोलिसांना महिला सुरक्षेपेक्षा फ्रेन्ड्सचा मालक महत्त्वाचा वाटतो, अशी टीका केली जात आहे.

सीताबर्डी बाजारात फ्रेन्ड्स नावाचे कापड विक्रीचे दुकान आहे. या दुकानातून कापड खरेदी करताना दोन अभियांत्रिकीच्या मुलींना तेथे कपडे बदलण्याच्या खोलीत छुपा मोबाईल कॅमेरा सापडला. याप्रकरणी शुक्रवारी सीताबर्डी पोलिसांनी नोकर निखिल ऊर्फ पिंटू दीपक चौथमल (२७) विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक केली. परंतु दुकान मालक किसन इंदरचंद अग्रवाल (५४) याच्याविरुद्ध नोकराच्या चारित्र्याची पडताळणी न केल्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून ताबडतोब जामिनावर सुटका करण्यात आली.  काही तासांच्या तपासात पोलिसांनी अग्रवालला क्लिन चिट दिल्याने यात अर्थपूर्ण व्यवहार झाल्याची माहिती येत असून वरिष्ठ अधिकारी सीताबर्डी पोलिसांना जाब विचारत असताना त्यांच्याकडून दिशाभूल करण्यात येत असल्याचे समजते.

अश्लील व्हिडीओचा ‘व्यापार

कपडे बदलताना महिलांची चित्रफित तयार केल्यानंतर संबंधित व्यक्ती संगणकावरून मॉर्पिग करतो. मॉर्पिगमध्ये विविध पद्धतीने व्हिडीओ व चलचित्राशी खोडतोड करून किंवा अ‍ॅनिमेशनद्वारा ते अतिशय उत्तेजक करण्यात येते. त्यानंतर ते विविध पॉर्न संकेतस्थळावर अपलोड करून व्हर्च्युअल क्रेडिट घेतले जाते. या अश्लील छायाचित्र व व्हीडिओपासून मोठय़ा प्रमाणात पैसा कमावला जातो.

फ्रेन्ड्समध्ये उघडकीस आलेली घटना अतिशय धोकादायक आहे. अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी आरोपींची नांगी ठेचणे गरजेचे आहे. एखादी मुलगी किंवा महिलेची अशी चित्रफित पॉर्न साईटवर टाकल्यास किंवा व्हायरल झाल्यास पीडितेचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांचा खटाटोप निंदनीय आहे. मालकाविरुद्धही गुन्हा दाखल करून महाराष्ट्र दुकान आस्थापना कायद्यांतर्गत दुकानाचा गुमास्ता परवाना रद्द करण्यात यावा.

– राजेश निंबाळकर, कामगार नेते.

फ्रेन्ड्समधील घटना गंभीर आहे. मालकाला जामीन देऊन का सोडण्यात आले, याची चौकशी करण्यात येईल. तसेच यात सीताबर्डी पोलिसांकडून गैरव्यवहार झाला असल्यास उपायुक्तांच्या माध्यमातून चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. शहर पोलिसांनी नेहमीच महिला सुरक्षेला प्राधान्य दिले आहे.

– डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलीस आयुक्त.

First Published on August 15, 2019 1:03 am

Web Title: misleading police to rescue friends owner abn 97