शवविच्छेदनासाठी दोन मृतदेह २२ तास पडून
‘मेडिकल’च्या न्यायवैद्यकशास्त्र विभागातील प्राध्यापक व निवासी डॉक्टरांच्या वादात रुग्णांचे हाल होत असतानाच ‘मेयो’च्याही न्यायवैद्यकशास्त्र विभागाचा घोळ गुरुवारी पुढे आला. मेयोत दोन मृतदेह शवविच्छेदनाकरिता तब्बल बावीस तासाहून जास्त वेळ पडून राहिले. त्यामुळे या दोन्ही मृतांच्या नातेवाईकांना रात्र थंडीत पदपथावर काढावी लागली. या विषयावर मेयो प्रशासन व पोलीस प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवत असले तरी रुग्णांचे हाल टाळण्याकरिता लोकप्रतिनिधी काय करणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
अनिल रघुशे (५३, रा. भिवापूर) आणि कल्पना वाकुडकर (४८, रा. अडपल्ली, गडचिरोली) अशी दोघा मृतांची नावे आहेत. अनिल रघुशे याचा मृत्यू २५ नोव्हेंबरला नागपूरच्या सदर येथील पाटनी ऑटोमोबाईलजवळ झाला. त्यांना एका वाहनाची जोरदार धडक बसली होती. त्यांचे पार्थिव विच्छेदनाकरिता नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे दुपारी ४ वाजता पोहोचले. सुमारे तासभरात शवविच्छेदन अपेक्षित असताना त्याला तब्बल २२ तासाहून जास्तचा कालावधी लागला. तर कल्पना वाकुडकर या बैलगाडीतून तीन दिवसांपूर्वी अडपल्ली येथे पडल्या होत्या. त्यांना प्रथम गडचिरोलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात व तेथून गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते.
प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे बघत त्यांना २५ नोव्हेंबरला नागपूरच्या चांडक क्रिटीकल केयरला हलवण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनाकरिता त्यांचे पार्थिव मेयोत २५ नोव्हेंबरच्या दुपारी पोहोचले. याही शवविच्छेदनाकरिता मेयो प्रशासनाला तब्बल २४ तासांहून जास्तचा कालावधी लागल्याची माहिती आहे. दरम्यान, मेयोच्या गलथान कारभाराने दोन्ही कुटुंबातील सदस्यांना थंडीच्या दिवसात संपूर्ण रात्र पदपथावर काढावी लागली. या विषयावर मेयो प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर पोलिसांकडून मृतदेहाच्या पंचनामासह काही प्रक्रिया झाली नसल्याचे सांगितले. पोलिसांकडून सगळी कारवाई झाल्यावरही मेयोकडून विलंब झाल्याचे सांगण्यात आले. परंतु मेयो प्रशासन व पोलिसांच्या वादात मात्र मृतदेहाची येथे थट्टा होत असल्याचे या घटनेतून पुढे आले आहे. या घटनेमुळे स्वतसाठी आंदोलन करणारे निवासी डॉक्टर रुग्णांसह मृतदेहाचे शवविच्छेदन वेळीच करण्यासह गरीब रुग्णांना अद्यावत आरोग्य सेवा देण्याकरिता तीव्र भूमिका बजावणार काय? हा प्रश्न सामान्य नागरिकांपुढे उपस्थित झाला आहे.