उत्सवी झगमटात आणि प्रायोजक कंपन्यांच्या जाहिरातबाजीत ‘विघ्नहर्ता’ म्हणून भक्तिभावाने पुजले जाणारे श्रीगणेश दैवत लुप्त झाले आहे. छोटय़ा सणाला जेव्हा उत्सवाचे रूप येते तेव्हा साहजिकच वाढत्या खर्चाची तजवीज करावी लागते आणि त्यासाठी प्रायोजकांची मिनतवारीही. त्यांच्या सर्व अटी मान्य कराव्या लागत असल्यानेच ही वेळ आल्याची प्रचिती काही मोठय़ा सार्वजनिक मंडळांना भेटी दिल्यावर येते.
सामाजिक प्रबोधनाचे प्रभावी माध्यम म्हणून लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा सुरू केली. कालौघात त्याला उत्सवी स्वरूप आले. देखावे, रोषणाईवर होणारा लाखो रुपये खर्च लोकवर्गणीतून करणे अवघड असल्याने प्रायोजक शोधणे क्रमप्राप्त ठरत गेले. सुरूवातीच्या काळात गणेशोत्सव हा सण प्रायोजकांची गरज होती, परंतू त्याला उत्सवी रुप आल्यानंतर वाढता खर्च भागविण्यासाठी ती मंडळांची गरज बनली. त्यातूनच प्रायोजकांच्या अटी मान्य करण्याचे धोरण रुढ होत गेले. किंबहुना त्याशिवाय पर्यायच उरला नाही. त्यामुळे श्रीं च्या मंडपापासूनचे सर्व खर्च भागविण्यासाठी मंडळावर प्रायोजक कंपन्यांचाच वरदहस्त असण्याला पर्याय उरला नाही. त्याला श्री गणेश मूर्तीचाही अपवाद नाही. प्रवेशव्दार, परिसरातील मोकळी जागा, देखावे आदी कमी पडतात म्हणून की काय, मूर्तीच्या जवळ जाहिरातीचे फलक दिमाखाने लटकलेले दिसतात.

शहरातील प्रमुख मार्गाने फेरफटका मारला तरी लक्षात येते की, गणेश मंडळांनी उभारलेली प्रवेशव्दारेही कोणत्या ना कोणत्या कंपन्यांनी प्रायोजित केलेली असतात. मंडप परिसरातील जागा विविध कंपन्या किंवा बांधकाम व्यावसायिकांच्या नवीन योजनांची माहिती देणाऱ्या स्टॉल्सने व्यापलेली असते. प्रायोजकांच्या या भाऊगर्दीत राजकीय आणि विविध संघटनांच्या नेत्यांचाही समावेश असतो. देणगी जेवढी मोठी तेवढे भव्य कटाऊटस् असा यासाठी सर्वसाधारण मापदंड आहे. प्रायोजकांची संख्या अधिक असली तर तेवढी कटआऊट्सची संख्या वाढत जाते. हे चित्र सार्वत्रिक आहे, त्यात लहान वा मोठे मंडळ असा भेदभाव दिसत नाही.
मंडळं, त्यांचे प्रायोजक यांच्या चढाओढीत सामान्य गणेश भक्तांची मात्र परवड होते. गणेश दर्शनाआधी त्यांना इच्छा असो वा नसो नेत्यांच्या कटा्ऊटसचे दर्शन घडते. मूर्तीपुढे डोकं टेकवण्याआधीच ‘फ्लॅट’च्या किंमतीचा आलेख नजरेखालून जातो. काही ठिकाणी पाकीट बंद प्रसाद वाटला जातो, त्यावर देणाऱ्यांचे नाव व छायाचित्र असते. त्यामुळे प्रसादाचेही पावित्र्य कमी होत असल्याचे दिसते.
शहरातील मोठय़ा आणि प्रसिद्ध गणेश मंडळाचे व्यवस्थापन करणाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा उत्सव आता ‘इव्हेंट’ झाला असून, तो त्याच पद्धतीने साजरा करावा लागतो. आकर्षक देखावे, आकर्षक रोषणाई, मूर्ती, मंडप, कार्यकर्ते यांच्यावरील खर्च हा ५ ते १५ लाखांवर जातो. केवळ वर्गणी गोळा करून हा उत्सव साजरा करण्याचे दिवस कधीच गेलेत. साहजिकच प्रायोजकांचे वर्चस्व वाढण्याला पर्याय नाही. मंडळांची संख्या अधिक आणि प्रायोजक कमी अशा व्यस्त प्रमाणात प्रायोजकांच्या अटी मान्य करण्याशिवाय मंडळांपुढे पर्यायच नसतो. दरवर्षी वेगळ्या सजावटी, देखाव्यांच्या अहमहमिकेत उत्सवाच्या खर्चाचीही कमानही चढीच राहते. तसे केले नाही तर गर्दी होत नाही आणि गर्दी झाली नाही तर प्रायोजक मिळत नाही. असे हे दृष्टचक्र! ते भेदण्याची ना कोणा गणेशभक्ताची इच्छा ना कोणाची तक्रार हे मात्र विशेष!