सात वर्षांनंतर पालकांशी भेट

देशाच्या विविध भागात जात आणि धर्माच्या नावावरून रोज नवनवीन वाद उद्भवत असताना नागपुरात मात्र हिंदू-मुस्लिम सलोख्याचे अनोखे उदाहरण पाहायला मिळाले. घरून पळून आलेल्या सात वर्षीय मुस्लिम मुलाची जडणघडण एका हिंदुत्त्ववादी संघटनेव्दारे संचालित शाळेत झाली. कुटुंबापासून दुरावलेला हा मुलगा सात वर्षांनंतर त्यांच्या पालकांना मिळाला. ते त्याला घरी घेऊन गेले.
मो. अजीम असे या मुलाचे नाव आहे.

उत्तर प्रदेशमध्ये सहारनपूरमध्ये राहणारा मो. शफीक आणि कमरजहाँ यांना चार मुले आणि एक मुलगी. त्यात मो. अजीम हा सर्वात लहान.  एक दिवस घरामध्ये कुठल्या तरी कारणावरुन भावांमध्ये वाद झाला आणि मोठा भाऊ आणि वडिलाने मो. अजीम याला मारले. त्यावेळी तो सात वर्षांचा होता. घरात कुणी नसल्याचे पाहत तो घराबाहेर पडला आणि सहारनपूर रेल्वेस्थानकावर गेला. तेथून त्याने दिल्ली  गाठली. दिल्ली रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्मवर काही दिवस भीक मागून दिवस काढले. गाडीमध्ये तो साफसफाई करीत होता. रेल्वेने प्रवास करत असताना मुंबईला आला आणि त्या ठिकाणी लहान मुलांसाठी काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेला तो भेटला. ते त्याला रेल्वे पोलिसांकडे घेऊन गेले. मुलगा अल्पवयीन असल्यामुळे  पोलिसांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना त्याला सांभाळण्यास सांगितले. तेथून तो २०११ मध्ये नागपूरला विश्व हिंदू परिषद जनकल्याण संस्था संचालित रेल्वे प्लॅटफॉर्म शाळेत आला. शाळेत आल्यावर सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत आगलावे यांच्या मदतीने तो  सरस्वती विद्यालयात तो शिक्षण घेत होता. चार महिन्यापूर्वी ही  शाळा बंद झाली. शाळेतील मुले वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागली. मो. अजीम हा बजेरिया भागात चार-पाच मुलांसोबत राहत होता.

दरम्यान मो. अजीमचे वडील मो. शफीक, आई कमरजहाँ आणि त्याच्या भावाने  अजीमचा शोध घेतला मात्र, तो कुठेच त्यांना सापडला नाही. अखेर त्यांनी मुलाची आशा सोडून दिली. परंतु आईला आपला मुलगा कुठेतरी आहे, असे सारखे वाटत होते.मोमिनपुरा भागात राहणारा मो. मुझफ्फर हा युवक नक्षीकाम शिकण्यासाठी सहारनपूरला गेला असता त्याची मो. शफीक यांची भेट झाली. त्यांनी मुझफ्फरला माझा मुलगा घरातून निघून गेला आहे आणि तो कुठे दिसला की सांग असे म्हणत अजीमचा फोटो त्याला दिला. नागपुरात आल्यावर मुझफ्फरने मोमिनपुरा भागातील ओळखीच्या एका ऑटोचालकाला हा  फोटो दिला. हा ऑटोचालक अनेकदा प्लॅटफॉर्म शाळेत जात होता. त्यामुळे त्याला बाहेरून पळून आलेली मुले या ठिकाणी आहेत, याची माहिती होती. त्याने  श्रीकांत आगलावे यांची भेट घेतली आणि त्याला  फोटो दाखवला. श्रीकांतने तो फोटो बघून हा मुलगा आपल्या प्लॅटफॉर्म शाळेत असल्याचे  सांगितले. बजेरिया भागात त्या मुलांची भेट घेतली.  त्यानंतर ऑटो चालकाने मुझफ्फरची भेट घेऊन हा मुलगा नागपुरात असल्याचे सांगितले. मुझफ्फरने ही बातमी अजीमच्या  वडिलांना कळवली.

मो. अजीमचे कुटुंबीय नागपुरात आले. त्या मुलाला श्रीकांत आगलावे यांनी आपल्या घरी आणल्यानंतर त्याच्या पालकांना बोलावले आणि सात वर्षांनंतर आईवडिलांची भेट  झाली. यावेळी मुलगा मिळाल्याचा आनंद व्यक्त होत होता व दुसरीकडे  मुलाचा सांभाळ केल्याबद्दल कुटुंबीयांच्या डोळ्यात कृतज्ञताही होती.