20 February 2019

News Flash

भीमा कोरेगाव दंगलीच्या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही

राज्य सरकारने भीमा कोरेगाव प्रकरणातून दोन समाजातील ध्रुवीकरणाचा आपला हेतू साध्य केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड. (संग्रहित छायाचित्र)

आमदार जितेंद्र आव्हाड यांची टीका

राज्य सरकारने भीमा कोरेगाव प्रकरणातून दोन समाजातील ध्रुवीकरणाचा आपला हेतू साध्य केला आहे. आता ज्या समितीचा अहवाल सरकारला बंधनकारक नाही, अशी चौकशी समिती स्थापन करून निव्वळ धूळफेक केली जात आहे. या चौकशीला काही अर्थ नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी येथे आज पत्रकार परिषदेत केली.

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणाच्या चौकशीकरिता राज्य सरकारने उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती जे.एन. पटेल  अध्यक्षतेखालील द्विदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी चार महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या प्रकरणातून सरकारला जे साध्य करायचे होते, ते साध्य झाले आहे. आता चौकशी करून काहीही साध्य होणार नाही. कारण समितीचा अहवाल सरकारसाठी बंधनकारक नाही. अशा स्थितीत लोकांनी चौकशीला सामोरे जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

संभाजी भिडे हे तरुणांची माथी भडवण्यात पारंगत आहेत. त्यांना शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्याविषयी प्रश्न विचारलेले आवडत नाही. भिडेंच्या शिक्षणाबाबत उलटसुलट चर्चा आहे. फग्र्युसन महाविद्यालयात त्यांच्याविषयीच्या नोंदी आढळून आल्या नाहीत. उदयनराजे भोसले यांच्या म्हणण्यानुसार भिडे गणितात पीएच.डी. आहेत. काहींच्या मते ते आण्विक विज्ञानाचे तज्ज्ञ आहेत, परंतु उच्चशिक्षित असणे म्हणजे शिवी आहे, असे खुद्द भिडे त्यांच्या भाषणातून सांगतात. त्यावरून सरकारने भिडेंचे नेमके शिक्षण किती, याचा खुलासा करावा, अशी मागणी आव्हाड यांनी केली व भिडे यांच्या भाषणाची चित्रफित दाखवली.

राजकीय प्रसिद्धीसाठी शरद पवार यांच्यावर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भीमा कोरगाव प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांना यापूर्वी एका प्रकरणात अटक होऊ दिली नाही, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. त्यावर आव्हाड म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असून देखील प्रकाश आंबेडकर यांना त्यांची राजकीय पोकळी भरून काढता आली नाही. त्याऐवजी रामदास आठवले हे प्रभावी नेते होऊ शकले. आज आव्हान फॅसिस्टवाद्यांचे असताना आंबेडकर अशाप्रकारचे वक्तव्य करीत आहेत. राज्यातील अनेक नेत्यांनी राजकीय क्षितिजावर चमकण्यासाठी पवार यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. यापूर्वी दिवंगत गोपीनाथ मुंडे, गो.रा. खैरगार यांनी देखील पवार यांच्याविरोधात पुरावे असल्याच्या वल्गना केल्या होत्या. याकडे आव्हान यांनी लक्ष वेधले.

मुख्यमंत्र्यांची कोंडी

सरकारची आर्थिक कोंडी झाली आहे. सर्व नियोजन आणि धोरण अपयशी ठरले आहे. सरकारला गेल्या चार वर्षांत महसुलासाठी नियोजन करता आले नाही. नोटबंदी आणि जीएसटीने तर राज्य सरकारची आर्थिक स्थिती खिळखिळी केली आहे. पेट्रोल आणि डिझेलवर ‘सेस’ लावला नसता तर राज्याचा गाडा हाकणे कठीण झाले असते. मंत्री, आमदार यांचे काम होत नसल्याने नाराज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळातील सहकारी सहकार्य करीत नाहीत. मुख्यमंत्री एकटे पडले असून त्यांचे मंत्री परिस्थितीचा आनंद घेत आहेत, असे आव्हाड म्हणाले.

First Published on February 12, 2018 2:33 am

Web Title: mla jitendra awhad bhima koregaon violence investigation bhima koregaon violence