महाविकास आघाडी सरकार स्थापनेपासून चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र अवैध दारू, कोंबडा बाजार, वाळू व कोळसा तस्करी तथा सर्व प्रकारचे अवैध व्यवसाय जोरात सुरू झाले आहेत. या सर्व अवैध व्यवसायांकडे जिल्हा पोलीस दलाचे दुर्लक्ष झाले असताना कर्तव्यदक्ष अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी रस्त्यावर उतरून अवैध दारूविक्रेत्यांची नाकेबंदी केली आहे. मंगळवारी रात्री १० च्या सुमारास शहरात अवैध दारू घेवून येणाऱ्या सात वाहनांमधील एक कोटींचा दारूसाठा जप्त करून पोलीस दलाचा नाकर्तेपणा पून्हा एकदा उघडकीस आणला.

जिल्ह्यात अवैध दारूचा व्यवसाय सर्रासपणे सुरू आहे. मात्र, पोलीस प्रशासन अवैध दारूविक्रीवर नियंत्रण मिळविण्यास अपयशी ठरले आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांची भेट घेऊन चंद्रपूर जिल्ह्यात येत असलेली अवैध दारूची वाहतूक थांबवून अवैध दारूविक्रीवर कारवाई करा असे निवेदन दिले होते. त्यानंतर आमदार जोरगेवार यांना अवैध दारू विक्रेत्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. त्यानंतरही शहरात दारूचे ट्रकच्या ट्रक येत आहे. जोरगेवार यांनी मंगळवार १९ जानेवारीच्या रात्री चंद्रपुरात येणारी ७ अवैध दारूची वाहन पकडली आहे.

स्व:त आमदाराच अवैध दारूवाहतूकीवर कारवाई करीत असल्याने पोलिसांचा निष्काळजीपणा उघडकीस आला आहे. नागपूरमार्गे चंद्रपूर शहरात अवैध दारू वाहतूक करणारे तब्बल सात चारचाकी वाहनं रात्रीच्या अंधारात दाखल होत होती. आमदार जोरगेवार यांनी या सातही अवैध दारू विक्रेत्यांच्या वाहनांवर हल्लाबोल केला. जप्त करून वाहनं पडोली पोलीस ठाण्यात जमा केली. सात वाहनांमध्ये एक पायलट वाहन होते. त्याचे काम शहरात जाण्याचा मार्ग सुरळीत करून सावधान करणे होते.

सहा गाड्यांमध्ये एकूण १७०० ते २००० दारूचा पेट्या होत्या. वाहन व अवैध दारू असा एकूण १ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्व:त आमदारानेच दारू वाहतुकीवर कारवाई केल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे जोरगेवार यांनी अवैध दारूची वाहने पकडली तेव्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना भ्रमणध्वनीवर माहिती दिली. मात्र त्यांनी आमदारांनाच उडवाउडवीची उत्तरे दिली. यातूनच दारूविक्रेते व पोलीस यांच्याच संबंध कसे मधुर आहेत हे दिसून येते.

शहरात येणारी ही अवैध दारू गुप्ता नावाच्या व्यवसायिकाची असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे या गुप्ता नावाच्या दारूविक्रेत्याने काही दिवसांपूर्वी रामनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकावर जिवघेणा हल्ला केला होता. त्यानंतरही हा व्यक्ती अवैध दारू शहरात आणतो यावरून पोलीस किती गांभीर्याने काम करित आहे हे दिसून येते.

यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांच्याशी संपर्क साधला असता, एकूण सात वाहने ताब्यात घेतली असून १५८९ दारूच्या पेट्या असल्याचे सांगितले. एकूण सात वाहन चालक ताब्यात आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आमदार जोरगेवार यांचा फोन येताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते असेही ते म्हणाले. आमदार दारू पकडतो, याचा अर्थ पोलीस असमर्थ आहे काय, असे विचारले असता, काहीही उत्तर दिले नाही.