पदवीधर मतदारसंघ निवडणूक

नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारल्याने नाराज असलेले भाजपचे विद्यमान आमदार प्रा. अनिल सोले यांनी मंगळवारी निवडणुकीच्या संदर्भात आयोजित पूर्व विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे तर्क वितर्क  लावण्यात येत आहे.

भाजपने या निवडणुकीसाठी प्रा. सोले यांच्याऐवजी महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी दिली आहे.

कुठलेही सबळ कारण नसताना उमेदवारी का नाकारली, असा त्यांचा सवाल आहे. मंगळवारी  निवडणुकीच्या संदर्भात झालेल्या बैठकीतही ते सहभागी झाले नाहीत. पक्षाच्या नेत्यांनी संपर्क  साधून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न के ला. पण यात यश आले नाही, अशी माहिती आहे. त्यामुळे ते वेगळी भूमिका घेतात का, या चर्चेला सुरुवात झाली आहे. यासंदर्भात सोले यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे व विदर्भ प्रदेश मंत्री उपेंद्र कोठेकर यांच्यासह सहा जिल्ह्य़ांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत  निवडणूक संचलन समिती स्थापन करण्यात आली. त्यात सोले यांच्यासह माजी आमदार सुधाकर देशमुख, डॉ. रामदास आंबटकर, आमदार  गिरीश व्यास, आमदार परिणय फुके, खासदार रामदास तडस, खासदार अशोक नेते, खासदार सुनील मेंढे, प्रदेशमंत्री अर्चना डेहनकर, धर्मपाल मेश्राम, राजेश बकाने, तारिक कुरैशी, सुधीर दिवे व माजी आमदार चरण वाघमारे यांचा समावेश आहे.  तसेच जिल्हा निवडणूक प्रमुख नियुक्त करण्यात आले. यात नागपूर शहर-  आमदार प्रवीण दटके, नागपूर ग्रामीण -डॉ. राजीव पोतदार व जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, भंडारा- बाळा काशीवार, गोंदिया-आमदार विजय रहांगडाले,गडचिरोली- किसन नागदिवे, चंद्रपूर शहर- राजेंद्र गांधी व चंद्रपूर ग्रामीण- देवराव भोंगळे व  वर्धा – डॉ. शिरीष गोंडे यांचा समावेश आहे.

जोशी उद्या अर्ज भरणार

भाजपचे उमेदवार संदीप जोशी १२ तारखेला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सकाळी १०.३० वाजता संविधान चौकातून पक्षाच्या प्रमुख नेत्यांसोबत जोशी जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आहेत.