मंगळवारीतील शौचालयाचे प्रकरण

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सात दिवसात शौचालय पाडण्याचे फर्मान जनता दरबारात सोडले. मात्र त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी गेलेल्या महापालिका अधिकाऱ्यांना आमदार कृष्णा खोपडे यांनी रोखले. पालकमंत्र्यांच्या आदेशाचा अधिकाऱ्यांनी चुकीचा अर्थ लावल्याचा दावा खोपडे यांनी केला.

लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे झोननिहाय जनता दरबार घेऊन लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत.  गांधीबाग झोनमधील जनता दरबारात मंगळवारी झोपडपट्टी भागातील एका शौचालयासंदर्भात तक्रार होती. तक्रारकर्त्यांने शौचालयाचा त्रास रहदारीला होत असल्याचा दावा केला होता. त्यावर बावनकुळे यांनी शौचालय सात दिवसात पाडण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार गांधीबाग झोनच्या सहायक आयुक्तांनी नोटीस बजावली आणि १६ जानेवारीला पथक मंगळवारी शौचालय तोडण्यासाठी गेले, परंतु हे शौचालय महापालिकेने बांधून दिलेले आहे. ही जागा नझूलची आहे. त्याचा रहदारीला अडथळा नाही. नकाशा मंजूर करून घर आणि शौचालय बांधण्यात आले आहे. पालकमंत्र्याच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. त्या घरी राहणाऱ्यांना शौचालयासाठी दुसरीकडे जागा नाही, त्यामुळे शौचालय पाडता येणार नाही. असे पत्र आमदार खोपडे यांनी गांधीबाग झोनच्या सहायक आयुक्तांना दिले. तसेच नझूल खात्याला पत्र दिले. त्यामुळे  पथक माघारी फिरले. त्यानंतर धंतोली झोनमध्ये झालेल्या जनता दरबारात हा मुद्दा उपस्थित झाला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी वरील घटनाक्रम पालकमंत्र्यांना सांगितला. त्यावेळी त्यांची अडचण झाली.

तरीही त्यांनी  शौचालयाविरोधात तक्रार कोणाची होती, अशी विचारणा बावनकुळे यांनी केली. यावरून आपसातील भांडणातून ही तक्रार आल्याचे आणि पालकमंत्र्यांनी शहानिशा करता फर्मान सोडल्याची बाब चव्हाटय़ावर आली.

‘‘मंगळवारी भागात झोपडपट्टी आहे. १९७० मध्ये महापालिकेने सुमारे ४०० शौचलय बांधले होते. ते सगळे नझूलच्या जागेवर आहेत. आपसातील भांडणामुळे कोणीतरी तक्रार करते आणि महापालिका कारवाई करण्याचा प्रयत्न करते. अशी कारवाई करायची असेल तर सर्वावरच करावी लागेल. त्या जागेवर त्याच्या घराचा नकाशा मंजूर आहे. त्यात त्याने शौचालय दाखवले आहे. पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात तक्रार आली होती. पालकमंत्र्यांनी आदेश दिले की, तुम्ही चौकशी करा आणि रस्त्यावर किंवा पदपथावर येते का ते बघा, परंतु झोन अधिकाऱ्यांनी चुकीचा अर्थ काढून शौचालय पाडण्याची नोटीस बजावली.’’

– कृष्णा खोपडे, आमदार, पूर्व नागपूर</p>