आमदार तोडसाम यांच्या दोन पत्नींमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल करण्यात आला असून याप्रकरणी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा रद्द करून ऑनलाईनवरून व्हिडिओ वगळण्यात यावा, अशी विनंती करणारी याचिका प्रिया राजू तोडसाम यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे.

प्रिया राजू यांच्या या याचिकेवर न्या. झका हक आणि न्या. विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने याचिकाकर्त्यांची बाजू ऐकल्यानंतर यवतमाळ जिल्हा पोलीस आणि गुगलला नोटीस बजावली आहे.

राजू तोडसाम हे आमदार आहेत. १२ फेब्रुवारीला आमदारांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान राजू तोडसाम यांची पत्नी अर्चना आणि याचिकाकर्त्यां यांच्यात वाद झाला. यातून दोघींमध्ये हाणामारी झाली.

याप्रकरणी प्रिया तोडसाम यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या मारहाणीचे व्हिडिओ यूट्यूब आणि फेसबुकवर व्हायरल झाले. याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करावा व वादग्रस्त व्हिडिओ यूटय़ूब व फेसबुकवरून काढण्यात यावा, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली. याचिकाकर्त्यांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने यवतमाळचे अधीक्षक, पोलीस ठाण्याचे अधिकारी, गुगल आणि फेसबुकला नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्यांतर्फे अॅलड. रजनिश व्यास यांनी बाजू मांडली.