मेडिकलच्या श्वसनरोग विभागाचे निरीक्षण; जागतिक निद्रा दिन विशेष

इंटरनेट डेटाचे दर कोसळल्याने उपराजधानीतील तरुणांमध्ये रात्री समाज माध्यमांचा वापर वाढला आहे. विविध कारणांमुळे हल्ली टीव्ही पाहणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे अनेकांना निद्राविकार बळावला आहे, असे निरीक्षण मेडिकलच्या श्वसनरोग विभागाने केलेल्या अभ्यासातून पुढे आले आहे.

१५ मार्चला जागतिक निद्रादिन आहे. मेडिकलच्या अखत्यारित सुपरस्पेशालिटी रुग्णालय आहे, तर सुपरच्या श्वसनरोग विभागाच्या बाह्य़रुग्ण विभागात रोज सुमारे १०० ते १२५ रुग्ण येतात. यातील  १० जण निद्रा विकाराशी संबंधित तक्रारी घेऊन येतात. यापैकी  ६ जण रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर किंवा टीव्हीवरील कार्यक्रम  तासन्तास बघत असतात. त्यावेळी वीज दिवे बंद असतात.  मोबाईल किंवा टीव्हीतून निघणारी निळी किरणे मानवाच्या झोपेसाठी आवश्यक असलेल्या शरीरातील रसायनावर प्रभाव टाकतात. त्यामुळे मानवी झोप कमी होते.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार एकूण लोकसंख्येत ४५ टक्के व्यक्तींना झोपेशी संबंधित आजार आहेत. मनुष्याला होणाऱ्या ९० टक्के आजाराची कारणे निद्रानाशात दडलेली असतात. आजाराचे मूळ शोधताना डॉक्टरांनी आता रुग्णाच्या झोपेचीही माहिती घेणे आवश्यक आहे. मधुमेहाच्या विळख्यात अडकलेल्या ४२ व्यक्ती गंभीर स्लीप अ‍ॅप्निया सिंड्रोमने ग्रासले असतात. निद्रानाशाचे ८६ टक्के रुग्ण मानसिक आजाराच्या उंबरठय़ावर आहेत. उच्च रक्तदाब असलेल्या ८४ टक्के नागरिकांना स्लीप अ‍ॅप्निया आढळतो. मधुमेह आणि रक्तदाब असलेल्या रुग्णांमध्ये घोरणे आणि स्लीप अ‍ॅप्नियाचे प्रमाण अधिक आहे. घोरण्यामुळे शरीराला पुरेसा प्राणवायू मिळत नाही. श्वास अडकून झोपमोड होते. पुरेशी झोप झाली तर मेंदू त्याचे काम नियमितपणे  पूर्ण करू शकतो, असे मेडिकलच्या श्वसनरोग विभागाचे डॉ. सुशांत मेश्राम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

८८ प्रकारच्या आजाराचा धोका

निद्राविकार तज्ज्ञांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेने केलेल्या अभ्यासानुसार झोपेमुळे हृदय, मेंदूआघातासह ८८ प्रकारच्या आजाराचा धोका असतो. झोपेची दुसरी अवस्था खंडित झाल्याने हृदयक्रिया प्रभावित होते, तर तिसऱ्या अवस्थेतील असंतुलनाने मधुमेह आणि रेम अवस्थेतल्या असंतुलनाने नैराश्य, स्मरणशक्तीवर प्रभाव पडतो.

अपुऱ्या झोपेमुळे मानवी शरीरातील रसायनावर परिणाम होऊन लवकरच वृद्धत्व येते.

झोपेच्या चार अवस्था असतात व त्यांची एक साखळी असते. झोपेदरम्यान प्रत्येक ९० मिनिटांनी पूर्ण होते. पहिल्या ३ अवस्था ७० मिनिटांच्या आणि शेवटची (रेम) अवस्था २० मिनिटांची असते. एक व्यक्ती जर सरासरी ६ तास झोप घेत असेल तर ४ सायकल पूर्ण होतात. पहिल्या अवस्थेत मेंदूतल्या पेशीची क्षमता वाढते. जिथे गरज आहे, तिथल्या भागात या अवस्थेत मेंदू दुरुस्ती करतो.  दुसऱ्या अवस्थेत रोगप्रतिकारशक्ती, तिसऱ्या अवस्थेत गुणसूात्रीय बदल आणि रेम अवस्थेत मेंदू रिचार्ज होतो. या अवस्था खंडित झाल्या, तर रोगप्रतिकार शक्ती कमी होते. त्यामुळे आजार बळावतात.

– डॉ. सुशांत मेश्राम, श्वसनरोग विभाग प्रमुख, मेडिकल, नागपूर.