मोदी लाटेत निवडून आलेले भाजपचे विद्यमान आमदार मल्लिकार्जून रेड्डी आणि शिवसेनेचे बंडखोर माजी आमदार अ‍ॅड. आशीष जयस्वाल यांच्यात रामटेक मतदारसंघात कडवी झुंड होण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसचे उदयसिंह यादव तिसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे.

शिवसेनेने युतीच्या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी केल्यानंतर देखील अ‍ॅड. जयस्वाल यांची पक्षातून हकालपट्टी केली नाही. केवळ युतीचा धर्म पाळा एवढी सूचना देऊन औपचारिकता पाळण्यात आली. याचा अर्थच शिवसेनेचा जयस्वाल यांना अप्रत्यक्ष पाठिंबा आहे. या मतदारसंघात दोघांमध्ये थेट लढत असल्याने विजय कोणाचाही झाला तरी फायदा युतीचाच अशी अवस्था आहे.

अ‍ॅड. जयस्वाल यांची प्रतिमा सुशिक्षित आणि सभ्य उमेदवार अशी आहे. ते तीनवेळा आमदार असताना मतदारसंघात नेटवर्क तयार केला आहे. त्यांच्या विश्वासातील सरपंच, जिल्हा परिषद सदस्य आहेत. मात्र, त्यांना भाजप आणि शिवसेनेत मतविभाजनाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

विद्यमान आमदार मल्लिकार्जून रेड्डी हे सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होतात. त्यांनी आदिवासी पट्टय़ातील लोकांना विश्वासात घेतले आहे. पण, ते विधानसभेत  मतदारसंघाचे प्रश्न नीट मांडताना दिसले नाहीत. आमदार म्हणून छाप पाडू शकले नाहीत. रेड्डी यांची पाच वर्षांची आमदार म्हणून कारकीर्द विशेष प्रभावी ठरली नाही, गेल्यावेळी ते निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आले होते. त्यांच्या जागी नवीन चेहरा द्यावा, अशी मागणी पक्षातून होती. काँग्रेसचे उदयसिंह यादव हे पक्षाचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. ते रामटेक पंचायत समितीचे उपाध्यक्ष राहिले आहे. त्यांचा हिंदी भाषक समाजावर प्रभाव आहे. या मतदारसंघातून उमेदवारीसाठी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक इच्छुक होते. तसेच डॉ. अमोल देशमुख यांनाही तिकीट हवे होते. मात्र, स्थानिकांकडून विरोध झाला. यादव यांच्या उमेदवारीने काँग्रेसजणांनाच धक्का बसला होता. इतर भागात त्यांना फार कोणी ओळखत नाही. अनुसूचित जाती, आदिवासी आणि ओबीसी मतदारांचा समावेश असलेला रामटेक मतदारसंघ १९६२ ते १९९१ पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला होता. १९९४ मध्ये केदार गटाचे अशोक गुजर अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर १९९९ ते २००४ आणि २००९ अशा सलग तीन निवडणुका शिवसेनेचे आशीष जयस्वाल यांनी जिंकून रामटेक हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध केले होते. २०१४ मध्ये भाजप व सेना युती तुटल्याने सेनेचे आशीष जयस्वाल यांचा पराभव करून भाजपचे मल्लिकार्जून रेड्डी प्रथमच विधानसभेत गेले.

या मतदारसंघात काँग्रेसचा पारंपरिक मतदार मोठय़ा प्रमाणात आहे. मात्र, यादव यांना जिल्ह्य़ातील नेत्यांकडून हवी तशी मदत मिळत नसल्याचे चित्र आहे. या प्रमुख उमेदवारांसह बसपाचे संजय सत्येकार, वंचित बहुजन आघाडीचे भगवान भोंडे, आम आदमी पार्टीचे ईश्वर गजबे मैदानात आहेत. बसपा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या आंबेडकरी मतांचे विभाजन होईल आणि त्याचा फटका काँग्रेसला बसण्याची अधिक शक्यता आहे.