छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची टीका

नागपूर : नरेंद्र मोदी यांच्या सरकारला महागाईवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आले आहे. किंबहुना भाजपला सरकार चालवता येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या सात वर्षांत ‘हिंदू-मुस्लीम, मंदिर-मशीद, युद्ध करेंगे, घुस के मारेंगे’ अशा प्रक्षोभक गोष्टीशिवाय या सरकारने जनहितासाठी काहीच केले नाही, अशी टीका छत्तीसगडचे मुख्यंत्री भूपेश बघेल यांनी आज बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

काँग्रेसने पेट्रोल-डिझेल, खाद्यतेल दरवाढ आणि महागाईच्या विरोधात देशभरात आंदोलन सुरू केले आहे. त्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री बघेल यांनी नागपुरातील प्रेस क्लबमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. मोदी सरकारला धार्मिक तेढ निर्माण करणे आणि देशाची सुरक्षा धोक्यात असल्याचा प्रचार करून भावानिक दिशाभूल  करण्याशिवाय काहीच जमत नाही. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या मालास भाव या लोकांच्या प्रश्नावर बोलण्याची वेळ येते तेव्हा भावनात्मक मुद्दा उपस्थित केला जातो. असेही बघेल म्हणाले.

शिंदे महाराज विकाऊ

ज्योतिरादित्य शिंदे यांना नागरी उड्डयन मंत्री करण्यात आले आहे. शिंदे हे महाराजा आहेत. तसेच एअर इंडियाचा लोगो देखील महाराजा आहे. केंद्र सरकार विमानतळ, विमाने विकत आहे. आता एअर इंडियाचे महाराजा  ‘आईए हम दोनो बिकाऊ है’ असे म्हणत आहेत, अशी कडवट  बघेल यांनी केली.

दोन अपत्यांच्या मुद्यावरून राजकारण

मोदींसाठी सात वर्षांपूर्वी भारतातील युवकांची सर्वाधिक संख्या हे बलस्थान होते. पण, आज त्यांना ते अडचणीचे वाटत आहे. सरकारने युवकांना दिशा दिली नाही. त्यांना रोजगार देण्यासाठी योजना नाही. आता उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर दोन अपत्याचा मुद्दा उपस्थित करून पुन्हा मूळ प्रश्नापासून युवकांना दूर नेण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेस सरकारने कुटुंब नियोजनचा कार्यक्रम हाती घेतला, तेव्हा याच लोकांनी १९७७च्या निवडणुकीत मुद्दा केला होता. केंद्राला खरच लोकसंख्या नियंत्रित करायची असेल तर दोन अपत्य असणाऱ्यांनाच शासकीय नोकरी देण्यात येईल, असे विधेयक संसेदत संमत करावे, असे आव्हान बघेल यांनी दिले.