विजयादशमी मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

मंगेश राऊत, नागपूर</strong>

‘मॉब लिंचिंग’ हा भारतीय शब्द नाही. विदेशी धर्मग्रंथातून हा शब्द आला आहे. हा शब्द भारतात कसा रूढ झाला, हे शोधण्याची गरज आहे. जमावाकडून होणाऱ्या हत्येसाठी ‘लिंचींग’  या शब्दाचा वापर करण्यामागे षड्यंत्र आहे. हिंदू समाजाला बदनाम करून अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मंगळवारी केले.

विजयादशमीनिमित्त येथील रेशीमबाग मैदानावर संघाच्या वियजादशमी उत्सवात ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एचसीएल समूहाचे अध्यक्ष शिव नाडर हे उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदी प्रामुख्याने या वेळी उपस्थित होते. तत्पूर्वी, सरसंघचालकांनी शस्त्रपूजन केले. या वेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना भागवत यांनी ‘मॉब लिंचिंग’, अनुच्छेद ३७०, आर्थिक मंदी, थेट परकीय गुंतवणूक, चांद्रयान मोहीम, महिला सुरक्षा आदी विषयांवर भाष्य केले.

‘जात, धर्म, भाषा प्रांतवादाच्या नावाने लोकांना भडकावून सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जमावाकडून होणाऱ्या हत्येचा प्रकार एकाच समुदायाकडून होत नाहीत. त्यासाठी दोन्ही समुदाय जबाबदार असू शकतात. अशा घटनांचा संघाशी संबंध नाही. त्यात एखाद्या स्वयंसेवकाचा संबंध असेल तर संघ त्याची पाठराखण करत नाही. या प्रकरणात जे जबाबदार असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे,’ असे भागवत म्हणाले.

‘यंदा अनेक सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत. २०१९ मध्ये विद्यमान सरकारला जनतेने २०१४ पेक्षा अधिक जागांवर निवडून देऊन सरकारच्या कार्यप्रणालीवर शिक्कामोर्तब केले. विद्यमान सरकार धाडसी असून, जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला संसदेच्या दोन्ही सभागृहांत इतर पक्षांनीही सरकारला पाठिंबा दिला आहे. हे मोठे यश असून पंतप्रधान, गृहमंत्र्यांसह सरकार अभिनंदनास पात्र आहे, अशा शब्दांत भागवत यांनी सरकारचे कौतुक केले.

‘चांद्रयान-२ मोहीम पूर्णपणे यशस्वी झालेली नसली तरी भारतीय वैज्ञानिकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. पण त्यावर समाधान मानून चालणार नाही. विश्वगुरू बनण्याचे अंतिम लक्ष्य गाठण्याचा टप्पा अद्याप दूर आहे. हा टप्पा गाठण्याच्या मार्गात दहशतवादी आणि फुटीरवाद्यांसारखे अनेक अडथळे येतील. सीमा सुरक्षेसंदर्भात सरकारने केलेले कार्य समाधानकारक असले तरी ईशान्येकडील राज्ये, सागरी मार्ग आणि द्वीपसमूहाच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असून तिथे सैन्य वाढविण्याची गरज आहे,’ असे भागवत यांनी सांगितले.

इम्रान खानलाही टोला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा नेहमी हिंदू राष्ट्राचा विचार व्यक्त करतो. हिंदू राष्ट्र  म्हणजे केवळ स्वत:ला हिंदू समजणारे नव्हे. हिंदू शब्दाची व्याख्या मोठी असून यात वेगवेगळ्या धर्माच्या, भाषेच्या सर्व लोकांचा समावेश होतो. देशाच्या विकासासाठी प्रयत्न करणारा प्रत्येक भारतीय हा हिंदू असून त्या शब्दप्रयोगामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे संघ व भारताविषयी गरळ ओकून बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना यश येत नाही, अशी टीकाही भागवत यांनी केली.

..तर राममंदिरासाठी कायदा करा

काही विषयांवरील निर्णय संवादातून व्हायला हवेत. काही प्रकरणांचा निकाल न्यायालयातून लागेल. निर्णय कोणाच्याही पक्षाच्या बाजूने लागला तरी इतरांची मने दुखावणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. सामाजिक सद्भावना राखणाऱ्या शब्दांचा वापर करण्याची जबाबदारी दोन्ही समुदायांची असून न्यायालयाच्या आदेशाचे पालन करायला हवे, असे प्रतिपादन सरसंघचालकांनी राममंदिराचे नाव

न घेता केले. कायद्याच्या चौकटीत राहून हे कार्य व्हायला हवे. पण गरज पडली तर सत्ताधाऱ्यांनी नवीन कायदाही करावा, असेही त्यांनी सूचित केले.

आर्थिक धोरणांबाबत सरकारची पाठराखण

एक्स्प्रेस वृत्तसेवा : जागतिक अर्थव्यवस्था मंदावली आहे. त्याचा परिणाम सर्वत्र होतो. चीन-अमेरिका यांच्यातील व्यापारयुद्धाचा परिणाम भारतासह अनेक देशांवर झाला आहे. मात्र, भारत सरकारने आर्थिक विकासदरवाढीसाठी काही महत्त्वाची पावले उचलली आहेत. त्याचे परिणाम लवकरच दिसतील, असा विश्वास व्यक्त करत भागवत यांनी आर्थिक धोरणांबाबत सरकारची पाठराखण केली.

अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी सरकारला थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय)आणि उद्योगांचे निर्गुतवणुकीकरण करणे भाग पडते. देशाचा आर्थिक विकासदर सध्या पाच टक्के असला तरी घाबरण्याची गरज नाही. या परिस्थितीतून सावरण्याची जबाबदारी केवळ सरकारची नसून, सर्वसामान्य जनतेसह भारतीय व्यापारी पुढे येऊन लघू व मध्यम उद्योगांना चालना देतील, असे त्यांनी सांगितले.

संघाचा स्वदेशीवर विश्वास आहे. स्वावलंबी बनल्यानंतरच जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप झाले पाहिजे. तेच खरे स्वदेशी आहे. त्यामुळे आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी बनवू शकणाऱ्या उद्योगांकडे आपण वळले पाहिजे, असे भागवत म्हणाले.

देशाच्या विकासासाठी लोकचळवळ हवी – शिव नडार

देशाचा विकास करण्याची जबाबदारी केवळ सरकारची नाही. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लोकांनी आंदोलन उभारले होते, तशाच प्रकारे विकासासाठी लोकांनी चळवळ उभी करावी, असे प्रतिपादन एचसीएल समूहाचे अध्यक्ष शिव नाडर यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आज देशाची लोकसंख्या १३० कोटींच्या घरात आहे. जवळपास ६० कोटी लोकसंख्या २५ वर्षे वयोगटांतील आहे. हे भारताचे सामर्थ्य आहे. मात्र जवळपास २७ कोटी लोकसंख्या अशिक्षित आहे. त्यामुळे देशाचा विकास करायचा असेल तर प्रत्येकाला शिक्षण, कौशल्याधारित प्रशिक्षणाची गरज आहे. शिक्षणामुळे लोकांना त्यांच्या जीवनात भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांची उकल होईल. ते इतरांना मार्गदर्शन करू शकतील व कुपोषण, भूकबळीसारख्या अनेक समस्या सुटतील, असे नाडर म्हणाले.  विकास साधायचा असेल तर सरकारवर अवलंबून राहण्यापेक्षा लोकांनीही सामाजिक चळवळ उभी करून या समस्या सोडवाव्यात. एचसीएल समूह अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेऊन शिक्षण व लोकांच्या सर्वागीण विकासाचे कार्य करीत असल्याचेही नाडर यांनी या वेळी सांगितले.