12 December 2019

News Flash

बंगालमधील हिंसाचार रोखण्यासाठी दंडशक्तीचा वापर गरजेचा

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन

तृतीय संघ शिक्षा वर्गाच्या समारोपप्रसंगी बोलताना सरसंघचालक  डॉ. मोहन भागवत.

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, त्याचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारला ‘दंडशक्ती’चा वापर करावा लागेल, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले. मात्र त्यांनी सरकार कोणते केंद्र की पश्चिम बंगाल सरकार याबाबत मात्र स्पष्ट भाष्य केले नाही.

रेशीमबागेतील स्मृती मंदिर परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाच्या समारोपप्रसंगी भागवत बोलत होते. पश्चिम बंगालमधील  हिंसाचाराचा उल्लेख भाषणात करताना भागवत म्हणाले, निवडणुकीच्या काळात आरोप-प्रत्यारोप होतच असतात. आता निवडणुका संपल्या, पण त्याचे कवित्व संपले नाही. आज पश्चिम बंगालमध्ये काय सुरू आहे. समाजा-समाजामध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्तेचा दुरुपयोग ही तर लोकशाहीची थट्टा आहे.काही शक्ती तेथे अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे.  एक पराभव सहन होणे ही चांगली बाब नाही. एकीकडे देश तोडणाऱ्यांविरुद्ध लढत असल्याचा देखावा करायचा आणि दुसरीकडे समाज समाजाला लढवून आपली राजकीय पोळी शेकायची हे चांगले नाही. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारला दंडशक्तीचाच वापर करावा लागेल.असे ते म्हणाले.

भारताला विकसित होऊ न देण्यासाठी जगात अनेकजण प्रयत्न करत आहेत. जगातील एकाही देशाचे भारतात पूर्ण समर्थन नाही. आपण सक्षम झालो म्हणून नाईलाजाने समर्थन करावे लागते. आज देश प्रगती करीत आहे अशावेळी आपसातील हे भांडणात देशाचे अहित पाहणाऱ्यांसाठी फायद्याचे ठरेल. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनीही संविधान सभेच्या भाषणात याकडे लक्ष वेधले होते, असे  भागवत म्हणाले.

केंद्र सरकारकडून अपेक्षा

भाजप पुन्हा सत्तेत आला. त्याच्याकडून काही अपेक्षा पूर्ण  झाल्या. काही व्हायच्या आहेत. आता पुन्हा नव्याने अपेक्षा वाढल्या आहेत त्या पूर्ण कराव्या लागतील, असेही भागवत म्हणाले.

First Published on June 17, 2019 12:26 am

Web Title: mohan bhagwat west bengal violence
Just Now!
X