चाचणी संच खरेदी प्रक्रियेला विलंब

महेश बोकडे
नागपूर :  जिल्ह्य़ातील तिसऱ्या सिरो सर्वेक्षणासाठी आवश्यक किट्स (चाचणी संच) वेळीच उपलब्ध न झाल्याने अद्याप हे कामच सुरूच झालेले नाही. तिकडे मेडिकलच्या अधिकाऱ्यांनी शहर  व ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांना या कामासाठी प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे या कामाला प्रत्यक्षात सुरुवात केव्हा होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.  यापूर्वी जिल्ह्य़ातील पहिल्या सिरो सर्वेक्षणाचा निष्कर्ष  प्रशासनाला तांत्रिक कारणाने जाहीर करता आला नव्हता. परंतु दुसरे सर्वेक्षण  पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले होते.

जिल्ह्य़ातील किती टक्के नागरिकांमध्ये करोना विरुद्ध लढण्याचे प्रतिपिंड (अ‍ॅन्टिबॉडी) तयार झाले, हे बघण्यासाठी येथे तिसऱ्यांदा सिरो सर्वेक्षण होणार आहे. विभागीय आयुक्तांनी ३१ ऑगस्टला आठ दिवसांत हे सर्वेक्षण सुरू होणार असल्याचे सांगितले होते. परंतु १५ सप्टेंबर झाल्यावरही सर्वेक्षणाच्या शुभारंभाचा पत्ता नाही.

तपासणी संच  मेडिकलच्या बायोकेमेस्ट्रिक विभागात न पोहोचल्याने हा विलंब होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जिल्हाधिकाऱ्यांकडून काही दिवसांपूर्वी मेडिकलच्या खात्यात संच खरेदीसाठी सुमारे ९.५० लाखांचा निधी वळता करण्यात आला. त्यानंतर मेडिकलकडून संबंधित कंपनीकडे  मागणी नोंदवली गेली. हे संच उपलब्ध करण्यासाठी आठ- दहा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता  कंपनीने वर्तवली. हा निधी थोडा विलंबाने मेडिकलकडे आल्याने व उशिरा मागणी नोंदवल्यामुळे हा विलंब होत असल्याची माहिती आहे.

६,१०० नमुने तपासणार

प्रस्तावित सिरो सर्वेक्षणासाठी ६ हजार १०० व्यक्तींचे नमुने घेतले जाणार आहेत. त्यात नागपूर महापालिका हद्दीतील १० वेगवेगळ्या झोनमधील प्रत्येकी ४ वार्डातील ७५ ते ८०  जणांचे एकूण ३ हजार १०० नमुने गोळा केले जातील. ग्रामीणमध्ये १३ तहसीलमधून प्रत्येकी १ मुख्यालय व प्रत्येक तहसीलमधील दोन गावातून एकूण ३ हजार नमुने गोळा केले जाणार आहेत. नमुने घेताना ६ ते १२, १२ ते १८, १८ ते ६० आणि ६० हून अधिक अशा चार वेगवेगळे वयोगट निश्चित करण्यात आले आहेत. यावेळी करोना प्रतिबंधात्मक लस घेतलेले, करोना होऊन बरे झालेल्यांचेही नमुने घेतले जातील.  जिल्ह्य़ातील सिरो सर्वेक्षणात प्रथमच लहान मुलांचा समावेश आहे.

दुसऱ्यात सर्वेक्षणात ३५ टक्के नागरिकांत प्रतिपिंड

नागपुरात प्रथम जून-२०२० मध्ये पहिले सिरो सर्वेक्षण झाले. त्यात करोना होऊन गेलेल्यांचा समावेश नव्हता. यावेळी शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागातील नागरिकांच्या नमुन्यांची संख्या कमी होती. यावेळच्या चाचणी संचाला अमेरिकन एफडीएकडून काळ्या यादीत टाकण्यात आल्यावर मात्र याबाबतचा निष्कर्ष घोषित केला गेला नाही. परंतु त्यावेळी सुमारे ४ टक्के जणांमध्ये प्रतिपिंड आढळले. त्यानंतर ऑक्टोबर २०२० मध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर सिरो सर्वेक्षणासाठी ४ हजार नागरिकांचे नमुने घेण्यात आले. त्यात २ हजार नागरिक शहरातील तर २ हजार नागरिक ग्रामीणचे होते. यावेळी शहरी भागात ४९.८ टक्के तर ग्रामीणला २१ टक्के आणि दोन्ही मिळून जिल्ह्य़ात ३५ टक्के नागरिकांत प्रतिपिंड आढळले. या दोन्ही वेळी १८ वर्षांहून अधिक वय असलेल्यांचेच नमुने घेतले गेले.