News Flash

शहरापेक्षा ग्रामीण भागात सक्रिय करोनाग्रस्त अधिक

शहरात दिवसभरात १४, ग्रामीणला १५, जिल्ह्याबाहेरील १२ असे एकूण ४१ मृत्यू झाले. 

(संग्रहित छायाचित्र)

२४ तासांत ४१ मृत्यू; नवीन १,१८९ रुग्णांची भर

नागपूर : जिल्ह्यात २४ तासांत ४१ करोना रुग्णांचा मृत्यू तर १ हजार १८९ नवीन रुग्णांची भर पडली.  जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार, मंगळवारी जिल्ह्यात सक्रिय रुग्ण शहरापेक्षा ग्रामीण भागात  अधिक दाखवले गेले. गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात सातत्याने ग्रामीणहून शहरात अधिक  रुग्ण आढळत असताना  ग्रामीणला सक्रिय रुग्ण अधिक दाखवण्यात आल्याने  आरोग्य विभागाच्या नोंदीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

शल्यचिकित्सकाच्या अहवालानुसार, मंगळवारी शहरात ११ हजार ८७८ तर ग्रामीणला १२ हजार ८७ असे एकूण  २३ हजार ९६५ सक्रिय  रुग्ण आहेत.  याशिवाय २४ तासांत शहरात ५९१, ग्रामीणला ५८६, जिल्ह्याबाहेर १२ असे एकूण १ हजार १८९ नवीन करोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या ३ लाख २६ हजार ८३५, ग्रामीण १ लाख ३७ हजार ११५, जिल्ह्याबाहेरील १ हजार ४५३ अशी एकूण जिल्ह्यात ४ लाख ६५ हजार ४०३ रुग्णांवर पोहोचली आहे. तर शहरात दिवसभरात १४, ग्रामीणला १५, जिल्ह्याबाहेरील १२ असे एकूण ४१ मृत्यू झाले.

यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या ५ हजार १५१, ग्रामीण २ हजार १९९, जिल्ह्याबाहेरील १ हजार २७१ अशी एकूण जिल्ह्यात ८ हजार ६२१ रुग्णांवर पोहोचली आहे.  दिवसभरात शहरात ११ हजार २४९, ग्रामीणला ५ हजार ९४८ अशा एकूण १७ हजार १९७  चाचण्या झाल्या. त्यांचे अहवाल बुधवारी अपेक्षित आहेत.

सोमवारी तपासलेल्या १३ हजार २६१ नमुन्यांमध्ये १ हजार १८९ रुग्णांना करोनाचे निदान झाले. त्यामुळे सकारात्मक अहवालाचे प्रमाण ८.९६ टक्के नोंदवले गेले.

४५ वर्षांवरील नागरिकांचे आज लसीकरण

राज्य शासनाचे निर्देशानुसार ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना बुधवारी करोना लसीचा पहिली व दुसरी मात्रा दिली जाईल. राज्य शासनाने या वयोगटातील नागरिकांना दोन्ही मात्रा देण्यासाठी लस उपलब्ध करून दिली आहे. केंद्र शासनाच्या नवीन निर्देशानुसार आता कोविशिल्डचा दुसरा डोज १२ ते १६ आठवड्यामध्ये नागरिकांना द्यावयाचा आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी. ज्या नागरिकांना कोविशिल्डचा पहिली मात्रा १२ आठवड्यापूर्वी घेतली त्यांना दुसरी मात्रा दिली जाईल. महापालिकेच्या सर्व  केंद्रांवर लसीकरण केले जाईल. आरोग्य सेवक, फ्रंट लाईन वर्कर यांनाही दुसरी मात्रा दिली जाईल.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज) व स्व. प्रभाकर दटके रोग निदान केंद्र येथे कोव्हॅक्सिनची फक्त दुसरी मात्रा उपलब्ध आहे. तसेच १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सध्या स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त  राम जोशी यांनी दिली. तसेच ड्राइव इन व्हॅक्सिनेशन केंद्रावर ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होईल.

‘चाचणी आपल्या  दारी’ उपक्रम 

आता शहरातील विविध भागात आणि बाजारात करोना चाचणी सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी सतरंजीपुरा झोनमध्ये प्रथमच ‘चाचणी आपल्या दारी’ या उपक्रमातंर्गत इतवारी बाजारात करोना चाचणी करण्यात आली. नेहरू पुतळा ते मस्कासाथ चौक इतवारीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या प्रत्येक दुकानात दुकानदारांची करोना चाचणी करण्यात आली. यास प्रत्येक दुकानदाराने सहकार्य केले. या सर्व दुकानातील दुकान मालक व सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. तसेच रस्त्यावर विनामुखपट्टी वावरत असणाऱ्या नागरिकांची सुद्धा चौकाचौकात चाचणी करण्यात आली. यात एकूण २१७ करोना तपासण्या करण्यात आल्या. या सर्व नागरिकांना त्यांचे अहवाल फोनवर कळवण्यात येईल. तसेच ज्यांना केलेल्या चाचणीची प्रत पाहिजे असेल त्यांनी लालगंज चौक येथील दवाखान्यात जाऊन घ्यावी, अशी माहिती झोनचे सहायक आयुक्त विजय  हुमणे यांनी दिली.

विदर्भात पुन्हा १६० हून अधिक मृत्यू

विदर्भातील अकरा जिल्ह्यात २४ तासांत १६३ करोना  रुग्णांचा मृत्यू झाला तर ५ हजार ८०० नवी रुग्णांची नोंद करण्यात आली.  येथे गेल्या दोन दिवसांपासून करोना मृत्यूची संख्या दीडशेहून खाली नोंदवली जात असतानाच पुन्हा ती संख्या १६० हून अधिकवर गेली आहे. मंगळवारी नागपुरात १४, ग्रामीण १५, जिल्ह्याबाहेरील १२, अशा एकूण ४१ रुग्णांचा मृत्यू झाला. शहराहून ग्रामीण भागात जास्त मृत्यू नोंदवले गेले. नागपूर जिल्ह्यात २४ तासांत १ हजार १८९ नवीन रुग्ण आढळले. विदर्भातील एकूण मृत्यूत नागपूर जिल्ह्यातील २५.१५ टक्केमृत्यूंचा समावेश आहे. भंडाऱ्यात ५ रुग्णांचा मृत्यू तर १४७ रुग्ण, अमरावतीत २० मृत्यू तर ७९८ रुग्ण, चंद्रपूरला २६ मृत्यू तर ३७० रुग्ण, गडचिरोलीत ८ मृत्यू तर २५६ रुग्ण, गोंदियात ४ मृत्यू तर १९० रुग्ण, यवतमाळला १५ मृत्यू तर ७२७ रुग्ण, वाशीमला १ मृत्यू तर ४३७ रुग्ण, अकोल्यात १६ मृत्यू तर ४२५ रुग्ण, बुलढाण्यात ६ मृत्यू तर ८०४ रुग्ण, वर्धा जिल्ह्यात २१ मृत्यू तर ४५७ नवीन रुग्ण आढळले.

२८ प्रतिष्ठानांवर कारवाई

महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी २८ प्रतिष्ठानांवर कारवाई करून २ लाख २५ हजारांचा दंड वसूल केला. पथकाने तीन झोनमध्ये ९ दुकाने बंद करण्याची कारवाई केली. गांधीबाग झोन अंतर्गत प्रेसिडेंट वाईन शॉप, किल्ला रोड, कमाल रेडिमेड, मोमिनपुरा, पिंटू सावजी जुनी मंगलवारी आणि भव्य साडी, नंगा पुतला चौक या दुकानांना कुलूप ठोकण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत शहीद चौक इतवारीमधील जैन होजेरी स्टोअर्स, चंदन गारमेन्ट व वामन थ्रेडस फॅक्टरी शांतीनगर तसेच मंगळवारी झोनमधील पूनम चेंबर छावणी येथील मॅक डोनल्ड रेस्टॉरेन्ट आणि अंजुमन कॉम्प्लेक्स सदर येथील बेल्जीयम वाफले दुकानाला टाळे ठोकले. पथकाने ४८ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.

आमदार निवासात करोना चाचणी केंद्र  

महापालिकेच्या वतीने आमदार निवास विंग -३, सिव्हिल लाईन्स या ठिकाणी महापौर दयाशंकर तिवारी आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार करोना चाचणी केंद्र सुरू करण्यात आले. आमदार निवास येथे सध्या करोना रुग्णालय सुरू असून त्यामध्ये १०८ रुग्ण उपचार घेत आहेत. चाचणी  केंद्र सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत सुरू राहील. या चाचणी केंद्राची वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली.  ?

रुग्णालयात दाखल रुग्ण पाच हजारांखाली

जिल्ह्यातील २३ हजार ९६५ एकूण सक्रिय रुग्णांपैकी गंभीर संवर्गातील ४ हजार ७०० रुग्ण विविध कोविड रुग्णालय वा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार तर  १९ हजार २६५ रुग्णांवर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अनेक आठवड्यानंतर जिल्ह्यातील  रुग्णालयांत दाखल रुग्णांची संख्या पाच हजारांखाली आली आहे.

खाटा, औषध, रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधा

शासकीय आणि खासगी रुग्णालयात खाटा मिळण्यासाठी :

०७१२-२५६७०२१ / ७७७००११५३७ / ७७७००११४७२

औषधे व प्राणवायू मिळण्यासाठी  :

०७१२-२५५१८६६ / ७७७००११९७४

रुग्णवाहिकेसाठी : ०७१२-२५५१४१७ / ९०९६१५९४७२

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 12:12 am

Web Title: more active corona virus patient in rural areas than in cities akp 94
टॅग : Coronavirus
Next Stories
1 बँक ऑफ महाराष्ट्रची अनुत्पादित कर्जाची रक्कम २,१३७.८९ कोटींवर!
2 प्राणवायू पुरवठ्यातील वेळ वाचणार 
3 केंद्राच्या निर्णयानंतर लगेच प्लाझ्मादान शिबिरांना ‘ब्रेक’!
Just Now!
X