महेश  बोकडे

ग्रामीण भागात संख्या जास्त असण्याची शक्यता

विद्यार्जनाचे महत्त्वाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांसमोर सध्या एक वेगळेच आव्हान उभे ठाकले आहे. निम्म्याहून जास्त म्हणजे ६० टक्क्यांच्या जवळपास शिक्षक लठ्ठ किंवा लठ्ठपणाच्या मार्गावर आहेत. आई-वडील, आजी-आजोबांसह रक्ताच्या नातेवाईकांमध्ये मधुमेहाचा इतिहास असलेल्या शिक्षकांमध्ये सामान्यांच्या तुलनेत असा लठ्ठपणा जास्त असल्याचा निष्कर्ष एका अभ्यासात पुढे आला आहे. उपराजधानीतील १४ शाळांतील महिला व पुरुष अशा दोन्ही संवर्गातील ८९० शिक्षकांवर हा अभ्यास करण्यात आला.

डायबेटिक केअर फाऊंडेशन ऑफ इंडिया (डीसीआरसी)च्या नागपूर शाखेने उपराजधानीत केलेल्या या अभ्यासाला इंटरनॅशनल जनरल ऑफ डायबेटीज इन डेव्हलपिंग कंट्री या जागतिक पातळीच्या जनरलमध्ये प्रकाशितही करण्यात आले आहे. या निरीक्षणात २५ वर्षांहून जास्त वयोगटातील ८९० शिक्षकांची तपासणी करण्यात आली. त्यात २५९ पुरुष व ६३१ महिलांचा समावेश होता. या सर्वाचे वजन, उंची, बॉडी मास इंडेक्स, मधुमेहासह काही वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या.

यात ४७ जणांना मधुमेह असल्याचे निदान झाले. ८४३ जणांमध्ये मधुमेह आढळला नाही. मधुमेह आढळलेल्यांचा कौटुंबिक इतिहास पाहण्यात आला. त्यात एकूण रुग्णांतील ८२ टक्के जणांच्या आई-वडील, आजी-आजोबांसह रक्ताच्या नातेवाईकांपैकी कुणा एकाला मधुमेह असल्याचे पुढे आले.

कौटुंबिक इतिहास नसलेल्यांपैकीही १८ टक्के शिक्षकांनाही मधुमेह असल्याचे निदान झाले. कौटुंबिक इतिहास असलेल्या मधुमेहग्रस्तांमध्ये बॉडी मास इंडेक्स जास्त आढळल्यामुळे त्यांच्यात लठ्ठपणा जास्त आढळला तर कौटुंबिक मधुमेहाचा इतिहास नसलेल्यांमध्ये लठ्ठपणा कमी होता. मधुमेहग्रस्तांतील ५.३ टक्के जणांना मधुमेह असल्याची माहिती  होती, परंतु इतरांना हा आजार असल्याचे प्रथमच कळले. यातील १३.४ टक्के जणांना सध्या मधुमेह नसला तरी ते या आजाराच्या उंबरठय़ावर असल्याचे पुढे आले. शहरात मधुमेहाबाबत जागृती होत आहे. ग्रामीणमध्ये मात्र ती कमी असल्याने ही संख्या तेथे याहून जास्त असण्याची शक्यता अभ्यासात वर्तवण्यात आली आहे. एकंदरीत या अभ्यासात प्रत्येक पाचवा शिक्षक मधुमेहग्रस्त किंवा या आजाराच्या जवळ असल्याचे पुढे आले.

१२ टक्के शिक्षक अतिलठ्ठ

वजन आणि उंचीच्या प्रमाणातून बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) काढले जाते. बीएमआयच्या मदतीने संबंधिताच्या शरीर आणि उंचीच्या तुलनेत वजन कमी किंवा जास्त आहे, हे ओळखता येते. वैद्यकीय निकषानुसार १९ ते २३ बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) हे सामान्य मानले जाते. १८.५ पेक्षा कमी बीएमआय अपेक्षेपेक्षा कमी वजन मानले जाते. परंतु या निरीक्षणात सुमारे ६० टक्के लठ्ठपणाच्या जवळ असलेले आणि लठ्ठ असलेल्यांपैकी २३ ते ३० बीएमआय (जास्त वजन असलेले) म्हणजे लठ्ठपणाचा धोका असलेले २४ टक्के पुरुष आणि १४ टक्के महिला आढळल्या. ३० ते ४० बीएमआय म्हणजे लठ्ठ असलेले ४१ टक्के पुरुष तर ३९ टक्के महिला आढळल्या. अतिलठ्ठ असलेल्यांची संख्याही सुमारे १२ टक्के आहे.

व्यायामाचा अभाव, खानपानाच्या वाईट सवई, बैठी जीवनशैली यामुळे शिक्षकांमध्येही लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. प्रत्येकाने आपल्या खाणे, व्यायाम याकडे लक्ष दिले तर लठ्ठपणा टाळता येतो. त्यामुळे मधुमेह, हृदयरोगापासून दूर राहता येते.

– डॉ. सुनील गुप्ता, डायबेटिज केअर फाऊंडेशन ऑफ इंडिया, नागपूर.