प्रवाशी संख्या अधिक असूनही शहर बसस्थानकाची दुरवस्था झाली आहे. केवळ टिनचे शेड लावून ती उभारण्यात आली आहे. दुसरीकडे प्रवासी मिळणार की नाही, याबाबत साशंक ता असलेल्या मेट्रोची स्थानके उभारण्यासाठी मात्र कोटय़वधी रुपये खर्च केले जात आहे. वर्धा मार्गावरील तीन स्थानकांचा प्रत्येकी खर्च हा २५ ते २८ कोटी रुपयांदरम्यान आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या दोन साधनांबाबत असा भेदभाव का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

नागपूर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक वाहतुकीचे प्रमुख साधन म्हणून शहर बसकडे पाहिले जाते. या व्यवस्थेकडे सुरुवातीपासूनच दुर्लक्ष झाल्याने आणि नंतर महापालिकेच्या हाती सूत्रे आल्यावर व्यवस्थेचे वाटोळे झाले असले तरी आजही शहर बसने जाणाऱ्यांची संख्या इतर साधनांच्या तुलनेत अधिक आहे. मात्र, सोयी सुविधांकडे दुर्लक्ष आहे. शहर बसची स्थानके केवळ टीनचे शेड लावून तयार केली आहे. अनेक ठिकाणी तर स्थानके नाहीत. आहे तेथे प्रवाशी नीट बसू शकत नाही, परिसर अस्वच्छ आहे. प्रवाशांचे अवागमन एवढाच स्थानकाचा प्रमुख उद्देश असल्याने या विरोधात कोणी ओरडही करीत नाही.

दुसरीकडे मेट्रोचा थाट आहे. ९ हजार कोटींहून अधिक खर्च करण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचे जमिनीवरून धावणाऱ्या मेट्रोचे काम पूर्ण झाले आहे. या  मार्गावर विमानतळ, विमानतळ दक्षिण आणि खापरी ही तीन स्थानके असून त्याच्या उभारणीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. अलीकडेच महामेट्रो प्रशासनाने या तीन प्रकल्पाचा पाहणी दौरा प्रत्रकारांसाठी  आयोजित केला होता. ही स्थानके अतिशय आकर्षक आणि देखणी व्हावी, असा प्रयत्न महामेट्रोचा असून त्याअनुषंगानेच या स्थानकांची उभारणी सुरू आहे. याचा प्रत्येकी खर्च प्रत्येकी २५ ते २८ कोटी रु पये असल्याची माहिती या कामाचे प्रकल्प संचालक त्रिपाठी यांनी दिली. खापरीचे स्थानक मुंबईतील बांद्रा रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर तयार केले जात आहे, तर नवीन विमानतळ (न्यू एअर पोर्ट) च्या स्थानकाचा आकार दीक्षाभूमीसारखा आहे. येथे आवश्यक त्या सर्व सुविधा प्रवाशांसाठी आहे. मात्र, येथून प्रवासी बसतील का, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. खापरी स्थानकाजवळ लोकवस्ती नाही, हेच चित्र नवीन विमानतळ आणि विमानतळ स्थानकाची आहे. या तीनही स्थानकांचे अतर खूप कमी आहे. त्यामुळे इतक्या कमी अंतरासाठी मेट्रोने प्रवास करण्याऐवजी  शहर बस चांगली, अशी प्रतिक्रिया या भागातील नागरिक देतात. मेट्रोने जास्तीत जास्त नागरिकांनी  प्रवास करावा म्हणून महामेट्रोने वेगवेगळ्या योजना तयार केल्या आहेत. फिडस सेवेसह  इतर सुविधांचा त्यात समावेश आहे. मात्र, केवळ प्रवाशांच्या अवागमनापुरते मर्यादित असलेल्या स्थानकावर एवढा खर्च कशासाठी, असा सवाल आता नागरिकच करू लागले आहेत.