वाडीत ‘ऑनर किलिंग’चा प्रकार
वाडी पोलीस ठाण्यांतर्गत एका तरुणीचा १३ जुलैच्या रात्री मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी तिच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच पोलीस धडकले व त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) शवविच्छेदनासाठी पाठविला. शुक्रवारी मात्र शवविच्छेदन अहवाल पोलिसांना मिळाल्यावर या तरुणीचा गळा आवळून खून झाला असून ती मृत्यूच्या वेळी दोन ते तीन महिन्यांची गर्भवती होती, असे निष्पन्न झाले. समाजात कुटुंबाची बदनामी होईल, या भीतीने आईनेच तिची गळा आवळून हत्या केल्याचे क्र पोलीस चौकशीत स्पष्ट झाले आणि हा ‘ऑनर किलिंग’चा प्रकार उघडकीस आला
अंकिता समाधान मेश्राम (१९) असे मृत युवतीचे नाव आहे. अंकिताचे वडील ट्रकचालक आहेत. तिला दोन भाऊ असून तेही ट्रकचालक आहेत. शिवाय, अंकिताचे शिक्षण जेमतेम नववीपर्यंत झाले होते. वडील आणि भाऊ दिवसभर कामासाठी घराबाहेर असल्याने घरात आई आणि अंकिताच राहायची. अंकिताचे एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. त्याच्यापासून ती गर्भवती होती. ही माहिती अंकिताची आई आरोपी मुक्ताबाई समाधान मेश्राम (४५) हिला समजल्यावर मुक्ताबाई तिच्यावर या संबंधित युवकाशी लग्न न करणे आणि गर्भपात करण्यासाठी दबाव टाकत होती. परंतु अंकिता आपल्या निर्णयावर ठाम होती. १३ जुलैच्या रात्री मुक्ताबाई आणि अंकिता एकाच ठिकाणी झोपलेल्या होत्या. त्यावेळी मुक्ताबाईने अंकिताच्या ओढणीनेच तिचा गळा आवळून खून केला, परंतु गेल्या काही दिवसांपासून गर्भधारणेमुळे अंकिताचे पोट दुखत होते, त्यामुळेच तिचा झोपेतच मृत्यू झाला, असा बनाव रचला. त्यानंतर १४ जुलैला सकाळी नातेवाईकांना घटनेची माहिती दिली आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. घरी सर्व नातेवाईक आणि समाजातील नागरिक घरी गोळा झाले. त्यादरम्यान सकाळी एका अज्ञात व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून अंकिताच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला. त्यानंतर वाडी पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेहाचा ताबा घेतला.

पतीनेच दिली पत्नीविरुद्ध तक्रार
पोलिसांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदनाचा अहवाल शुक्रवारी पोलिसांना मिळाला. त्यावेळी अंकिताचा गळा आवळून खून झाला असून ती मृत्यूवेळी दोन ते तीन महिन्यांची गर्भवती होती, असे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी मुलीचे वडील समाधान मेश्राम आणि आई मुक्ताबाई यांची कसून चौकशी केली. त्यावेळी मुक्ताबाईने आपणच समाजातील बदनामीच्या भीतीने मुलीचा खून केल्याचे कबूल केले आणि समाधान मेश्राम (५२) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून मुक्ताबाईला अटक केली.