रेस्टॉरन्ट, बगिचासह कुठेही करा अभ्यास; राज्यातील दंतच्या विद्यार्थ्यांकरिता वरदान
माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राचा झपाटय़ाने विकास होत असला तरी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात त्याचा फारसा वापर होताना दिसत नाही. त्यामुळे येथील विद्यार्थी जुन्याच पद्धतीने पुस्तकातून अभ्यास करतात. नागपूरच्या व्हीएसपीएम दंत महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. तपस्या कारेमोरे यांनी हे चित्र बदलण्याकरिता ‘मुखरोगनिदान व क्ष-किरणशास्त्र’ या विषयावर अद्यावत सॉफ्टवेअर तयार केले. त्यामुळे विद्यार्थी रेस्टॉरन्ट वा कुठेही बसून मोबाईल वा लॅपटॉपवर सॉफ्टवेअर अपलोड करून सहज अभ्यास करू शकतील.
राज्यात नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने दंतवैद्यकच्या सगळ्याच शासकीय व खासगी महाविद्यालयातील अभ्यासक्रम व शिक्षणाची पद्धत निश्चित केली जाते. येथील शासकीय दंत महाविद्यालय व व्हीएसपीएम दंत महाविद्यालयासह इतरही वैद्यकीय संस्था या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात. भारतात माहिती तंत्रज्ञानाचा झपाटय़ाने होणारा विकास बघता या विद्यापीठाकडूनही या पद्धतीचा वापर शिक्षणासाठी मोठय़ा प्रमाणावर होणे अपेक्षित होते, परंतु दुदैवाने गेल्या अनेक वर्षांत त्यासाठी फारसा प्रयत्न झाला नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. त्यामुळे आजही नागपूरसह राज्यात सर्वत्र दंतसह वेगवेगळ्या वैद्यकीय अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी मोठमोठी पुस्तके चाळताना दिसतात.
जुनाट पद्धतीने अभ्यास करताना या विद्यार्थ्यांना बराच ताण येतो. हे लक्षात घेऊनच येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. तपस्या कारेमोरे यांनी एका अद्यावत सॉफ्टवेअरवर काम केले आहे. यात त्यांनी ‘मुखरोगनिदान व क्ष-किरणशास्त्रा’तील सगळ्याच २० ते २२ प्रकरणांची इत्यंभूत माहिती टाकली. हे सॉफ्टवेअर कोणत्याही स्मार्ट फोन वा लॅपटॉपवर अपलोड करता येते. हे सॉफ्टवेअर वापरण्यासाठी विद्यार्थ्यांला प्रथम सॉफ्टवेअर उघडून त्यात लॉगइन करावे लागते. त्यात विद्यार्थ्यांला त्याची माहिती टाकावी लागते. त्यानंतर त्याला मुखरोगनिदान व क्ष-किरणशास्त्राची सगळीच प्रकरणे सहज वाचता येतात. हा अभ्यास केल्यावर विद्यार्थ्यांला त्याची ऑनलाईन वा ऑफलाईन परीक्षा देता येते. त्यात विद्यार्थ्यांला संबंधित प्रकरणांवर सुमारे २५ विविध प्रश्न विचारले जातात. त्याची उत्तरेही याच सॉफ्टवेअरमध्ये नमूद करावी लागतात. उत्तर बरोबर असल्यास सॉफ्टवेअर तसे कळवतो आणि उत्तर चुकल्यास त्याची माहिती देऊन अचूक उत्तरही सांगतो. त्यामुळे विद्यार्थ्यांला त्याला न समजलेले प्रकरणही सहज कळते. मोबाईल वा लॅपटॉपवर हे सॉफ्टवेअर अपलोड करणे शक्य असल्याने विद्यार्थ्यांना रेस्टॉरन्ट वा कुठेही बसून सहज या विषयाचा अभ्यास करणे शक्य झाले आहे.
हे सॉफ्टवेअर डॉ. कारेमोरे यांनी अमेरिकेतील एका नामांकित विद्यापीठातही सादर केले होते. या विद्यापीठाकडून त्यांना गौरवण्यात येऊन अद्यावत प्रकल्पाकरिता फेलोशिपही बहाल करण्यात आली. भारतातून केवळ १५ वैद्यक शिक्षकांनाच ती मिळाली, हे विशेष.

‘विद्यार्थ्यांना मोफत’
दंतवैद्यकच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सोपे जावे म्हणून हे सॉफ्टवेअर तयार केले आहे. त्यामुळे पदवी व पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास करण्याची गोडी निर्माण होऊन ते कुठेही, केव्हाही अभ्यास करू शकतील. या सॉफ्टवेअरचा लाभ जास्तीतजास्त जणांना व्हावा म्हणून तो विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देणार आहे, असे मत डॉ. तपस्या कारेमोरे यांनी व्यक्त केले.