ऊर्जामंत्र्यांचा महावितरणच्या संचालकांना सवाल; वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा संताप

नागपूर : शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. दुरुस्तीलाही ‘एसएनडीएल’कडून विलंब होत आहे. याबाबत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संताप व्यक्त करीत महावितरणनचे संचालक (संचलन) साबू यांना दूरध्वनी करून या कंपनीवर कारवाई का करीत नाही, अशी विचारणा केली. तसेच एसएनडीएल व महावितरणच्या अधिकाऱ्यांचीही कानउघाडणी केली.

शहरातील काँग्रेसनगर विभाग वगळता सर्वत्र एसएनडीएलकडून वीजपुरवठा केला जातो, परंतु गेल्या काही महिन्यांपासून एसएनडीएल ही कंपनी इतर कंपनीला हस्तांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना कळल्यामुळे  त्यांनी सध्या देखभाल- दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे  वीड खंडित झाल्यास दुरुस्तीलाही विलंब होतो. बिजलीनगर विश्रामगृह येथे सोमवारी झालेल्या बैठकीत हा मुद्दा गाजला.  एसएनडीएलला योग्य पद्धतीचे काम करायचे नसेल तर त्यांचा करार रद्द का करीत नाही, असा सवाल बावनकुळे यांनी साबू यांना केला. यापुढे अशाप्रकारचे काम खपवून घेणार नाही, असा इशाराही दिला. बैठकीत हजर एसएनडीएलसह महावितरणच्या अधिकाऱ्यांचीही कानउघाडणी केली गेली.

महावितरणच्याही भागात वीजपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी वाढल्याचे सांगत तांत्रिक कारणाशिवाय हा प्रकार घडत असल्यास संबंधितांची वेतनवाढ थांबवून त्यांच्यावर कारवाईच्याही सूचना ऊर्जामंत्र्यांनी बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. एसएनडीएलसह महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कामात दुरुस्तीचे आश्वासन याप्रसंगी दिले. याप्रसंगी महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, एसएनडीएलचे व्यवसाय प्रमुख सोनल खुरानासह इतरही अधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती.